आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान शिबीर:हिंगोलीच्या लक्ष्मी हॉस्पिटलने जपली सामाजिक बांधिलकी, आयोजित शिबिरात 127 रक्तदात्यांचे रक्तदान

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात रक्त पाटील यांचा तुटवडा लक्षात घेऊन लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल व माधव सपाटी मित्र मंडळाच्या वतीने शनिवारी ता.2 आयोजित रक्तदान शिबिरात 127 रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीमध्ये मागील काही दिवसात रक्त बाटल्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तपेढीमध्ये सातशे रक्त बाटल्या साठवण क्षमता असताना प्रत्यक्षात 30 ते 32 रक्त बाटल्याच उपलब्ध होत्या. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची रक्त बाटल्यांसाठी मोठी धावपळ होऊ लागली होती. त्यामुळे रक्तदात्यांनी वैयक्तिकरीत्या शासकीय रुग्णालयात येऊन रक्तदान करावे किंवा संस्थांनी रक्तदान शिबिरे आयोजित करावी असे आवाहन करण्यात आले होते.

त्यामुळे सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉ.अखिल अग्रवाल व माधव सपाटे पहेलवान मित्र मंडळाच्या वतीने आज लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी सुरू झालेल्या या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, अॅड. मनिष साकळे, सुरेश अप्पा सराफ, जगजितराज खुराणा, डॉ. श्रीधर कंदी यांनी शिबिराला भेट दिली.

विशेष म्हणजे पाडव्याचा सण आणि कडाक्याच्या उन्हात देखील रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी केली होती. या शिबिरात 127 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबीरात रक्त बाटल्या संकलित करण्यासाठी शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ.मयुर अग्रवाल, डॉ. मंगेश मुंडे, डॉ. संदीप इंगळे, माधव सपाटे व मित्र मंडळातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

दरम्यान या शिबिरामुळे शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये पुढील पंधरा ते वीस दिवस रक्त बाटल्यांचा तुटवडा जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...