आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावसमत शहरातील नवमोंढा भागात चोरट्यांनी भरदिवसां एका घरात प्रवेश करून चोरट्यांनी चार कपाट फोडून तब्बल 36 तोळे सोन्याचे दागिने तर 1.50 किलो चांदीचे दागिने पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मंगळवारी ता. 13 पहाटे वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे.
काय आहे घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील नवामोंढा भागात सतिष बाहेती यांचे तीन मजली घर आहे. सोमवारी ता. 12 दुपारी बाहेती कुटुंबातील सदस्य दुसऱ्या मजल्यावर आराम करीत होती. यावेळी घराच्या परिसरात दुपारच्या वेळी वर्दळ नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घराच्या तिसऱ्या मजल्यावरून जाऊन त्या ठिकाणी साहित्याची नासधुस केली. त्यानंतर खोलीमध्ये असलेल्या चार कपाटाचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील 36 तोळे सोन्याचे दागिने व 1.50 किलो चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला. यामध्ये सोन्याचे गंठण, नेकलेस सेट, बांगड्या, नथ, सहा अंगठ्या अशा 11.95 लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
गुन्हा दाखल
दरम्यान, दुपारी चार नंतर काही सदस्य तिसऱ्या मजल्यावरील खोलीत गेले असता त्यांना कपाट फोडलेले दिसून आले. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच या प्रकाराची माहिती वसमत शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, महिपाळे, जमादार भगीरथ सवंडकर, शेख नय्यर, प्रशांत मुंढे, शंकर हेंद्रे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भर दुपारी झालेल्या या घटनेमुळे पोलिस देखील संभ्रमात सापडले आहेत. या प्रकरणी सतिष बाहेती यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात आज पहाटे चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता पसिरातील सीसीटीव्ही फुजेटच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न चालविले असून काही संशयितांची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.