आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्ष लागवडीसाठी सेवाभावी संस्थांची मदत:हिंगोली जिल्हा परिषद राबवणार माझा वृक्ष माझी जबाबदारी अभियान, ग्रामीण भागातून वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेणार गावकरी

हिंगोली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यासाठी तसेच वृक्ष संगोपनासाठी जिल्हा परिषदेकडून माझा वृक्ष माझी जबाबदारी हे अभियान राबवले जाणार आहे. प्रत्येक गावात ग्रामपंचायत मार्फत राबविल्या जाणाऱ्या या अभियानात एका वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी गावकऱ्यावर सोपवली जाणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील 4 ते 5 वर्षापासून वृक्ष लागवड मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार सर्व विभागांना सहभागी करून घेत वृक्ष लागवड केली जात आहे. गाव पातळीवर मोकळ्या मैदानांवर वृक्ष लागवड केली जात असून काही ठिकाणी मियावाकी पद्धतीने घनदाट वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

यावर्षीही जिल्ह्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळ्यात वृक्ष लागवड केली जाणार आहे. या वृक्ष लागवडी सोबतच ग्रामीण भागात जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी तसेच गावकऱ्यांचा यामध्ये सहभाग असावा या उद्देशाने माझा वृक्ष माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेण्याचा निर्णय उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी घेतला आहे. गावपातळीवर राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेमध्ये प्रत्येक गावकऱ्यांना यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे.

ग्रामपंचायत च्या मार्फत गावकऱ्यांनी वृक्ष लागवड केल्यानंतर त्याचे संगोपन करण्याची जबाबदारीही गावकऱ्यांवर सोपवली जाणार आहे. याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी घनदाट वृक्ष लागवड देखील केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात लोकसहभागातून होणाऱ्या वृक्ष लागवडीमुळे जास्तीत जास्त वृक्षांचे संगोपन करण्याचा प्रयत्न होणार आहे.

ग्रामसेवक संघटनाही सहभागी होणार
या अभियानामध्ये ग्रामसेवक संघटनेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष दिलीप पांढरे पाटील, सचिव राजेश किलचे यांनी गाव पातळीवर जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून प्रत्येक ग्रामसेवकाकडून एका वृक्षाचे संगोपन करण्याचे ठरवले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सेवाभावी संस्थांची मदत घेणार: डॉ.विशाल राठोड उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली
या मोहिमेत सेवाभावी संस्थांना ही सहभागी करून घेतले जाणार आहे. महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, स्वच्छ भारत मीशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांच्या मदतीने हे अभियान राबवले जाईल. वन विभागाकडून रोपे उपलब्ध करून घेतले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...