आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदेशीर दारू विक्री:येडशी तांडा येथे बेकायदेशीर दारू विक्रेत्यांची मुजोरी, दारू पकडून देणाऱ्या महिलेवर केली दगडफेक

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा येथे बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची मुजोरी वाढली असून दारू पकडून देणाऱ्या महिलेवर दगडफेक करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आखाडाबाळापुर पोलीस ठाण्यात शुक्रवारी ता. १ रात्री दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा येथे बेकायदेशीर दारु विक्री होत असल्यामुळे गावकऱ्यांना मोठा त्रास होऊ लागला आहे. दारू विक्रेते चोरून-लपून दारू विक्री करू लागले होते.

दरम्यान बेकायदेशीर दारू विक्री मुळे गावात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले असून अनेकांचे संसार उध्वस्त होऊ लागले आहेत. या प्रकारामुळे गावातील बेबाबाई साहेबराव जाधव या महिलेने दारू विक्रेत्यांची दारू पोलिसांना पकडून दिली. या प्रकारामुळे दारूविक्री त्यांचे पित्त खवळले.

आमची दारू पोलिसांना का पकडून दिली या कारणावरून त्यांनी बेबाबाई जाधव व इतरांवर दगडफेक करून त्यांना जखमी केले. तसेच धमकी दिली. याप्रकरणी बेबाबाई यांच्या तक्रारीवरून आखाडाबाळापुर पोलिसांनी पांडू चिमना जाधव, राजू उर्फ बाळू लक्ष्मण जाधव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दरम्यान जिल्हाभरात मागील काही दिवसापासून ग्रामीण भागातून बेकायदेशीर दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील ढाबे व इतर हॉटेलमधून दारूची सर्रास विक्री होऊ लागली आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करू लागल्याने दारू विक्रेत्यांचे मनोधैर्य चांगलेच वाढले आहे. पोलीस विभागाकडून ग्रामीण भागातून बेकायदेशीर दारू विक्री बंद करण्याचे प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र डोळेझाक करू लागले आहेत त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. उत्पादन शुल्क विभागा मधील काही झारीतील शुक्राचार्य मुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही बेकायदेशीर दारू विक्रीचा थांगपत्ताही लागू दिला जात नसल्याचे चित्र आहे. मागील काही वर्षापासून उत्पादन शुल्क विभागामध्ये ठाण मांडून बसलेल्या कार्यालयातील तसेच क्षेत्रीय पातळीवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणीही केली जाऊ लागली आहे. शिवाय दारू विक्री त्यांना पाठबळ देणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणीही केली जाऊ लागली आहे.

पोलिसांनी सात दिवसात केल्या १५२ केसेस
हिंगोली जिल्ह्यात पोलिस विभागाने मागील सात दिवसात विशेष मोहीम हाती घेतली. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये १५२ केसेस करण्यात आल्या असून ३लाख ८९हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.