आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी वाऱ्याने हाहाकार:हिंगोली शहरात महाविद्यालयाच्या पाच वर्ग खोल्यावरील टीन पत्रे उडाली, तर वीजपुरवठा विस्कळीत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने चांगलाच हाहाकार उडवून दिला. अनेक ठिकाणी झाडे पडली तर एका महाविद्यालयावरील पाच खोल्यांची पत्रे उडून गेली आहेत. यामुळे वर्गखोल्या उघड्या पडल्या आहेत.

हिंगोली शहरासह जिल्हाभरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण सोबतच वारे वाहू लागले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तुफान वादळी वारासोबतच पाऊस झाला. या पावसामुळे समोरील वाहने देखील दिसणे कठीण झाले होते. तर वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली.

शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या पाच वर्ग खोल्यावरील टीन पत्रे उडून बाजूला पडली. त्यामुळे या वर्गखोल्या उघड्या पडल्या आहेत. वर्गखोल्यामध्येही पावसाचे पाणी साचले होते. या वादळी वाऱ्यामध्ये महाविद्यालयाचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हळदवाडी येथील गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. सायंकाळी वादळी वाऱ्यात देखील उपोषणार्थी ठाण मांडून होते. या आंदोलनामध्ये महिलांचाही सहभाग होता.

वीजपुरवठा विस्कळीत

दरम्यान वादळी वाऱ्यामध्ये एनटीसी विभागातील टेहरे हॉस्पिटल समोर मोठे झाड वीज वाहिन्यांवर पडल्यामुळे वीजवाहिन्या तुटून खाली पडल्या. तसेच आझम कॉलनी भागात तीन पत्रे उडून वीज वाहिन्यांवर पडल्यामुळे वीजवाहिन्या तुटल्या तसेच सहा खांब कोसळले आहेत. यामुळे शहरातील काही भागांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजीचा सूर

हिंगोलीत आज भुईमुगाची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे भुईमुगाचे पीक भिजल्याने नुकसान झाले. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतीमाल टीन शेडमध्ये तर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतीमाल रस्त्यावर टाकावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...