आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यातील मोतीबिंदू झालेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना नवी दृष्टी प्राप्त करून देण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात पुढील तीन वर्षांत मराठवाड्यातील २.३२ लाख नेत्र रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना नवी दृष्टी मिळणार आहे. नेत्र शस्त्रक्रियेचे नियोजन जिल्हास्तरावरून केले जाणार आहे.
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण सोसायटीच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांमधून मोतीबिंदूचे प्रमाण अधिक आहे. या नागरिकांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. मात्र मागील तीन वर्षांत कोविडमुळे राज्यातील शासकीय रुग्णालयातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत. त्यामुळे मोतीबिंदू झालेल्या नेत्ररुग्णांची मोठी अडचण झाली होती.
दरम्यान, केंद्र शासनाने आता राष्ट्रीय जीवन ज्योती अभियानाच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासकीय रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय नेत्ररुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यांना उद्दिष्ट ठरवून दिले आहे.
यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना चालू वर्षात ६४७१५ नेत्ररुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये गावपातळीवरील आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत गावात सर्वेक्षण करून पन्नास वर्षांवरील नेत्ररुग्णांची माहिती घेतली जाणार आहे. सदर माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत शासकीय रुग्णालय व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे पाठवल्या जाणार आहेत. त्यानंतर शस्त्रक्रिया केल्या जाणाऱ्या रुग्णांची यादी तयार करून शासकीय रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय शस्त्रक्रियेचे नियोजन केले जाणार आहे. या शिवाय रुग्णांची वाहतूक करण्याची तसेच औषधी उपलब्ध करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आता सर्वेक्षणाचे काम लवकरच केले जाणार असून त्यानंतर तातडीने शस्त्रक्रियांचे नियोजन केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान, मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे जिल्हास्तरावरून होणार नियोजन
सन २०२२-२३ या वर्षात जिल्हानिहाय दिलेले उद्दिष्ट
मराठवाड्यात या वर्षात ६४७१५ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद १२७८७, हिंगोली ४०६८, जालना ६७६८, लातूर ८४७९, नांदेड ११६१२, उस्मानाबाद ५७२७, परभणी जिल्ह्याला ६३४३ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट असून या नेत्ररुग्णांवर चालू वर्षात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून त्यांना नवी दृष्टी प्राप्त करून दिली जाणार आहे.
सन २०२३-२४ वर्षात ७७ हजार रुग्णांना मिळणार दृष्टी
मराठवाड्यात सन २०२३-२४ या वर्षात औरंगाबाद १५३४६, बीड १०७१८, हिंगोली ४८८२, जालना ८१२३, लातूर १०१७६, नांदेड १३९३७, उस्मानाबाद ६८७३, परभणी ७६१६ मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
सन २०२४-२५ वर्षात ८९ हजार शस्त्रक्रिया होणार
मराठवाड्यात सन २०२३-२४ या वर्षात औरंगाबाद १७०९२, बीड १२५०३, हिंगोली ५६९४, जालना ९४७६, लातूर ११८१०, नांदेड १६२५८, उस्मानाबाद ८०१७, तर परभणी जिल्ह्यात ८८८१ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
शस्त्रक्रिया विभाग अद्ययावत करण्याची तयारी सुरू
राज्यामध्ये राष्ट्रीय नेत्रज्योती अभियानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. यात सन २०२२-२३ या वर्षात ३ लाख ८८ हजार, सन २०२३-२४ या वर्षात ४ लाख ६५ हजार, सन २०२४-२५ या वर्षात ५ लाख ४३ हजार शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. राज्यात तीन वर्षांमध्ये सुमारे १३.५० लाख शस्त्रक्रिया होणार असून यामध्ये मराठवाड्यात तीन वर्षांत २.३२ लाख शस्त्रक्रिया होणार आहेत. या शस्त्रक्रियेसाठी राज्यातील शासकीय रुग्णालयांतील शस्त्रक्रिया विभाग अद्ययावत करण्याची तयारी सुरू झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.