आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड एसीबीचा ट्रॅप:वसमत तालुक्यात घरकुलाचा हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी 10 हजारांची लाच घेताना कंत्राटी अभियंत्यासह दोघे जाळ्यात

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील अकोली येथे घरकुलाचा तिसरा हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कंत्राटी अभियंता शेख समीर शेख खैसर यांना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. 11) दुपारी रंगेहात पकडले. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील अकोली येथील एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते. त्यानुसार लाभार्थ्याने घरकुलाचे कामही सुरू केले. या घरकुलाचा तिसरा हप्ता लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी वसमत पंचायत समितीचा कंत्राटी अभियंता शेख समीर शेख खैसर याने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच अन्य कंत्राटी अभियंता करीम कुरेशी शादुल्ला याने लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले.

या प्रकरणात संबंधित लाभार्थ्याने नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचचे उपाधिक्षक राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक राहुल पखाले, जमादार एकनाथ गंगातीर्थ, गणेश तालकोकुलवार, सचिन गायकवाड, किसन चिंतोरे, मारोती मुलगीर, शेख मुजीब, व गजानन राऊत यांच्या पथकाने अकोली येथे आज सापळा रचला होता.

दरम्यान ठरल्याप्रमाणे अभियंता शेख समीर याने आज दुपारी लाभार्थ्यांकडून दहा हजार रुपयाची लाच घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहात पकडले. याप्रकरणी शेख समीर व लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणारा अभियंता करीम कुरेशी यांच्याविरुद्ध वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी करीम कुरेशी यांचा शोध सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...