आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ग्रंथालय अनुदान वाढ, मराठवाड्याच्या 6 हजार कर्मचाऱ्यांना लाभ ; 60 टक्के अनुदानात वाढ

हिंगोली / मंगेश शेवाळकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ६० टक्के अनुदान वाढ तसेच दर्जा वाढीच्या घोषणेचा राज्यातील १२१४९ ग्रंथालयात कार्यरत २२००० कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून त्यांच्या वेतनामध्ये काही प्रमाणात का होईना वाढ होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे ग्रंथालय संघटनेतून स्वागत केले जात आहे.दरम्यान, मराठवाड्यामध्ये शासन मान्य असलेल्या ३९९५ ग्रंथालयांना दर्जा वाढीचा लाभ मिळणार असून त्यातून साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना शासनाच्या निर्णयाचा फायदा होणार आहे. पुढील एक महिन्यात होणाऱ्या दर्जा वाढीमुळे ग्रंथालय कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त हाेत आहे.

राज्यात शासनमान्य सार्वजनीक ग्रंथालयाची संख्या १२१४९ आहे. या ग्रंथालयातून २२००० कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र सन २०१२ पासून सार्वजनिक ग्रंथालयांना नवीन मान्यता देण्याचे बंद करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली नाही व दर्जा वाढसुद्धा झाली नाही. त्यामुळे ग्रंथालयातून कार्यरत कर्मचाऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसू लागला होता. कमी वेतनावर या ग्रंथालयातील लिपिक, ग्रंथपाल, सेवकांना काम करावे लागत होते. त्यामुळे ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी केली जाऊ लागली होती. या संदर्भात हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी ग्रंथालय संघटनेच्या मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू केला होता.

दरम्यान, शासनाने एका महिन्यात शासनमान्य ग्रंथालयांना निकषानुसार ६० टक्के अनुदान वाढ देण्याचा व दर्जा वाढ करण्याचा निर्णय घेतला असून नवीन मान्यता देणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे राज्यातील ग्रंथालयांना फायदा होणार असून मागील अनेक वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्येही वाढ होणार असल्याचे ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष सिद्धलिंग कीर्तनकार यांनी सांगितले.

अनुदानामध्ये वाढ होणार असल्याने ग्रंथालयांतून वाढीव पुस्तके खरेदी होणार ग्रंथालयांना त्यांच्या श्रेणीनुसार अनुदान मिळत होते त्यामुळे ग्रंथालयांना पुस्तके खरेदी करणे व इतर कामांवर खर्च करणे कठीण झाले होते. आता ग्रंथालयाच्या श्रेणीमध्ये वाढ होणार असल्याने ग्रंथालयाच्या अनुदानामध्येही चांगलीच वाढ होईल. त्यामुळे ग्रंथालयांना वाढीव पुस्तके खरेदी करता येणार असून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी विविध मार्गदर्शकांची पुस्तके उपलब्ध करून देता येणे शक्य होणार आहे.

राज्य शासनाच्या नवीन निकषात मराठवाड्यातील सर्व ग्रंथालये बसतील
मराठवाड्यात क वर्गातील २१५४ क वर्गातील ११९ तर ब वर्गातील ६४२ ग्रंथालय आहेत. या ग्रंथालयातून साडेसहा हजार कर्मचारी कार्यरत आहेत शासनाने ग्रंथालयांच्या दर्जा वाढीचा निर्णय घेतल्यामुळे मागील दहा वर्षांपासून दर्जा वाढीच्या असलेल्या ग्रंथालयांना व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासनाकडून नवीन निकष दिले जाणार असून यांनी निकषात मराठवाड्यातील सर्व ग्रंथालय बसतील.
- सुनील भुसे, सहाय्यक ग्रंथालय संचालक, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...