आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोविडमुळे अनाथ झालेल्या सुमारे ७०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. या विद्यार्थ्यांचा इयत्ता १२ वीपर्यंतचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च संघटनेकडून केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून माहिती मागवण्यात आली आहे.
राज्यात कोविडमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. काही विद्यार्थ्यांना आई किंवा वडील तर काही जणांना दोघांनाही गमवावे लागले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाहासोबतच पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोविडमुळे पालक गमावलेल्या अनेकांवर शाळा सोडण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.
मात्र, राज्यात कोविडमुळे अनाथ झालेल्या ७०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. या संदर्भात संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी राज्याध्यक्ष हस्तीमल बंब यांना पत्र पाठविले असून त्यानुसार निकषात बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती गोळा करण्याबाबत कळवले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हयातील अनाथ मुलांची माहिती गोळा केली जात आहे.
यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी वर्गात प्रवेशित असणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना जैन संघटनेच्या वाघोली (पुणे) येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील वसतिगृहात व्यवस्था केली जाणार आहे. एका कुटुंबातील एक किंवा दोन विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांना पुनर्वसन वसतिगृहात पाठविण्यासाठी त्यांच्या कायदेशीर पालकांची संमती बंधनकारक करण्यात आली आहे. सदर विद्यार्थी अनाथ झाल्यामुळे त्यांची घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्यास शैक्षणिक पुनर्वसनाची आवश्यकता असली पाहिजे. तसेच विद्यार्थी अनाथ असल्याचे शासकीय रुग्णालय किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र दाखल करणे आवश्यक असल्याचे निकष ठेवण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील इच्छुकांनी प्रकाशचंद सोनी, ॲड. मनीष साकळे, मिलिंद यंबल, तेजकुमार झांझरी, दीपक सावजी, रत्नाकर महाजन, उमेद सोवितकर, पारसमल जैन, प्रफुल्ल बोराळकर, अतुल बुर्से, सुरेश संचेती, राहुल मेने, चंद्रशेखर कान्हेड, कुलदीप मास्ट, राजकुमार बडजाते, डॉ. प्रेमंेद्र बोथर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे या संदर्भातील अर्ज भरून घेतले जात असून विद्यार्थ्यांची अंतिम यादी तयार झाल्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती व शैक्षणिक पुनर्वसनाची गरज लक्षात घेऊनच आवश्यकते प्रमाणे त्यांना पुनर्वसन प्रकल्पातील वसतिगृहात प्रवेश दिला जाणार असल्याचे हिंगोली जिल्हा जैन संघटनेचे पदाधिकारी प्रकाशचंद सोनी, ॲड. मनीष साकळे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.