आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भारधाव कारची दुचाकीला धडक, दोन तरुणांचा मृत्यू; हिंगोलीमधील आरळ शिवारातील घटना

प्रतिनिधी | हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील आरळ ते चिखली मार्गावर आरळ शिवारात भरधाव इनोव्हा कारने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी ता. २४ सायंकाळी पाच वाजता घडली आहे. सुशील लक्ष्मण मोरे (२४), विकास प्रकाश नरवाडे (२३ दोघे रा. कामठा ता. कळमनुरी) अशी मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील कामठा येथील सुशील मोरे व त्याचा मित्र विकास नरवाडे हे दोघे आज सकाळी त्यांच्या दुचाकी वाहनावर (क्र.एमएच-एए-५६३८) मित्राच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी वसमत तालुक्यातील रिधोरा या गावी गेले होते. त्यानंतर ते सायंकाळी दुचाकी वाहनावर परभणीकडे निघाले होते. आरळ ते चिखली या गावामध्ये आरळ शिवारात भरधाव इनोव्हा कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सुशील याचा जागीच मृत्यू झाला तर विकास गंभीर जखमी झाला.

या अपघाताची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, जमादार राठोड, कादरी, महेश अवचार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरळ येथील गावकऱ्यांच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्या विकासला उपचारासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातानंतर पोलिसांनी इनोव्हा चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

दरम्यान, मृत सुशील व विकास हे चांगले मित्र होते. दोघांचाही मनमिळावू स्वभाव होता. त्यांच्या अपघाती मृत्यूने कामठा गावावर शोककळा पसरली आहे. मृत सुशील याच्या मृतदेहावर हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात तर मृत विकास याच्या मृतदेहावर वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...