आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूटमार:दागिन्यांचा डबा समजून पळवला जेवणाचा डबा, सिरसम ते हिंगोली मार्गावर लुटण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी | हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिरसम ते हिंगोली मार्गावर जोडतळा शिवारात सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी दागिन्यांचा डबा समजून जेवणाचाच डबा पळवल्याने दागिने व रोख रक्कम सुरक्षित राहिली. याप्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यास सोमवारी (१ मे) रात्री गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दोघांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील सिरसम येथे अभिजित उदावंत यांचे सिरसम येथे सोन्या-चांदीचे दुकान आहे. सोमवारी आठवडी बाजार आटोपून दुकान बंद करून ते सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुचाकीवर हिंगोलीकडे निघाले होते. या वेळी सिरसम ते हिंगोली मार्गावर जोडतळा शिवारात दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली अन् त्यांना खाली पाडले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे अभिजित घाबरून गेले. या वेळी चोरट्यांनी त्यांच्याजवळील डबा व तिजोरीच्या चाव्या पळवल्या. या वेळी चोरट्यांनी अभिजित यांना दुचाकीवरून पाडून गडबडीत दागिन्यांचा डबा समजून जेवणाचाच डबा पळवला. त्यामुळे त्यांच्याजवळील दागिने व रोख रक्कम सुरक्षित राहिली.

या वेळी बासंबा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यापूर्वीच ग्रामस्थांनी दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. अन्य एक जण फरार झाला. राजू गणेश पवार (रा. इंदिरानगर, कळमनुरी), तौफिक खान पठाण (रा. उमरखेड) यांच्यासह अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली.