आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संचालकांवर गुन्हा दाखल:वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे आमिष; सहा लाखांची फसवणूक

हिंगोली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी जळगाव येथील महाविद्यालयात जागा उपलब्ध करून देण्याचे अामिष दाखवून तुप्पा (ता.कळमनुरी) येथील विद्यार्थ्याची ६ लाखांची फसवणूक झाली. याप्रकरणी ठाणे येथील मेरिट ब्ल्यू प्रा. लिमिटेड या कंपनीच्या तीन संचालकांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात बुधवारी (३ जुलै) सायंकाळी गुन्हा दाखल झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील तुप्पा येथील जितेश संजय देशमुख यास नीट परीक्षेत ५०५ गुण मिळाले होते. मात्र त्याला शासकीय कोट्यातून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्याने पेमेंट सीटवर प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. या वेळी त्याच्याशी ठाणे येथील मेरिट ब्ल्यू प्रा. लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी संवाद साधून त्यास जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी एक जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

त्यानुसार जितेश व त्याचे वडील संजय देशमुख हे ठाणे येथे गेले असता त्या ठिकाणी असलेल्या कंपनीच्या संचालिका शोभा राठोड, हिमांशी पाटील व संचालक करणसिंग बघोरिया यांची भेट घेतली. एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ६ लाख मागितले. संजय देशमुख यांनी २५ मार्च २०२२ रोजी ६ लाख कंपनीच्या खात्यात जमा केले. मात्र त्यानंतरही त्याला प्रवेश मिळालाच नाही. त्यामुळे पोलिसांनी शोभा राठोड, करणसिंग बघोरिया, हिमांशी पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...