आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावसमत तालुक्यातील वाई येथे आमदार राजू भैया नवघरे प्रतिष्ठानच्यावतीने शनिवारी ता. १४ आयोजित सामूहिक विवाह सोहळा तब्बल दीड तास उशिरा पार पडला. भर दुपारी प्रचंड उष्णतेमुळे तब्बल दहा ते बारा जणांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यांच्यावर वाई येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तर काही जणांना शिरड शहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले आहे.
वसमत तालुक्यातील वाई येथे आमदार राजू भैया नवघरे प्रतिष्ठानच्यावतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. मागील एक महिन्यापासून या सोहळ्याची तयारी सुरू होती. १११ जोडप्यांचा विवाह होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी विवाह सोहळा पार पाडण्याचे नियोजन होते.
दरम्यान, आज दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजेश नवघरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे तब्बल एक तासापेक्षा अधिक उशिराने म्हणजेच एक वाजून पन्नास मिनिटांनी विवाह सोहळा पार पडला.
या ठिकाणी एकशे अकरा जोडप्यांचे विवाह होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात ६० पेक्षाही कमी जोडप्यांचा विवाह संपन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातही भर दुपारी आयोजित या विवाह सोहळ्यात स्थानिक नेत्यांनी भाषणबाजी उरकून घेतली. मात्र त्यांच्या भाषणबाजीत उपस्थित प्रश्नाकडे वरिष्ठ नेत्यांनी मात्र साफ दुर्लक्ष केले.
या विवाह सोहळ्यात दहा ते बारा जणांना उष्माघाताचा त्रास झाला. ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय या विवाह सोहळ्यात उपस्थित मंडळींना आला. उष्णतेमुळे लहान मुलांनी तर चक्क अंगावरील कपडे काढून ठेवल्याचे चित्र होते. उष्माघात झालेल्या 10 ते 12 जणांना तातडीने वाई येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात तर काही जणांना शिरड शहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करायचेच होते तर दुपारी १२ पूर्वीची वेळ का ठेवली नाही अशी कुजबुज सुरू होती.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फिरवली पाठ
या विवाह सोहळ्यासाठी पालकमंत्री वर्षा गायकवाड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. मात्र या नेत्यांनी या विवाह सोहळ्यात कडे पाठ फिरवल्याने या प्रकाराची चर्चा सुरू होती.
राजू भैया नवघरे प्रतिष्ठानचा कौतुकास्पद उपक्रम -पवार
यावेळी खासदार शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. सध्याच्या परिस्थितीत सामुदायिक विवाह सोहळे काळाची गरज असून राजू भैया नवघरे प्रतिष्ठानने हाती घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही मार्गदर्शन केले. सामुदायिक विवाह सोहळे अजित करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाचे त्यांनीही कौतुक केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.