आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाताळा ग्रामपंचायत निवडणूक:10 वर्षे सरपंच असलेल्या सूनबाईचा सासूबाईने केला पराभव, निम्म्याहून अधिक मतांनी विजयी

मंगेश शेवाळकर | हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील हाताळा ग्रामपंचायतची निवडणुक सासू-सूनेच्या उमेदवारीने चांगलीच चर्चेत आली होती. या निवडणुकीकडे अवघ्या हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आज झालेल्या मतमोजणीमध्ये शोभाबाई धामणकर यांनी सरपंचपदासाठी ५७१ मते घेऊन विजय मिळविला. त्यांनी त्यांच्या सून संगिता धामणकर यांचा पराभव केला आहे.

प्रचारही सोबतच

सेनगाव तालुक्यातील हाताळा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी 5 जण निवडणुक रिंगणात होते. यामध्ये शोभाबाई धामणकर तर त्यांच्या विरुध्द त्यांची सून संगिता धामणकर यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे निवडणुकीचा प्रचारदेखील त्यांनी सोबतच केला. त्यामुळे सरपंचपदासाठी कोण बाजी मारणार?, याची उत्सुकता निर्माण झाली होती.

पराभूत सून 10 वर्षे सरपंच

विशेष म्हणजे आज पराभूत झालेल्या संगिता धामणकर यांनी यापूर्वी 10 वर्षे सरपंचपद भुषवले आहे. यावेळीही त्यांनी सरपंचपदासाठी आपली उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधातच नवख्या असलेल्या त्यांच्या सासू शोभाबाई धामणकर निवडणुक रिंगणात उतरल्या होत्या. या शिवाय कोमल काळे, शारदा काळे यांनी देखील सरपंचपदासाठी अर्ज दाखल केले होते.

321 मतांनी विजयी

दरम्यान, गावात सरपंच पदासोबतच सदस्य पदाचा प्रचार शिगेला पोहोचला होता. यामध्ये राजकारणात 10 वर्षे सरपंच असलेल्या संगिता बाजी मारणार का नवख्या असलेल्या त्यांच्या सासू शोभाबाई बाजी मारणार, याकडे स्थानिक नागरिकांसोबतच जिल्ह्यातील नागरीकांचे लक्ष लागले होते. आज सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी सुरु झाली. यामध्ये सरपंचपदासाठी असलेल्या शोभाबाई धामणकर यांनी ५७१ मते घेऊन विजय मिळविला. तर त्यांच्या सूनबाई संगिता धामणकर यांना २५० मते मिळाली. कोमल काळे यांना ४७५ तर शारदा काळे यांना १७ मते मिळाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या निवडणुकीत सासू वरचढ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...