आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर भरण्यासाठी गेल्यानंतर कर्मचारी नव्हते, वळोवेळी चकरा मारल्या होत्या असे कारण देऊन कर भरण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्यांच्या सोयीसाठी आता पालिकेने प्रभागनिहाय शिबीरांचा फंडा हाती घेतला आहे. पाणीपट्टी व मालमत्ता कराच्या सुमारे 8 कोटींच्या वसुलीसाठी शिबिरे घेतली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील 22 हजार मालमत्ताधारकांची सोय होणार आहे.
हिंगोली शहरात 22628 मालमत्ताधारक असून त्यांच्याकडे मालमत्ता करापोटी 6.39 कोटी रुपये तर पाणीपट्टीपोटी 2.65 कोटी रुपयांची कर वसुली आहे. कराची रक्कम भरल्याशिवाय प्रमाणपत्र दिले जाणार नाही अशी भुमीका मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी घेतली होती. मात्र यामध्ये अनेक वेळा विद्यार्थ्यांचेच नुकसान होऊ लागले होते.
दरम्यान, मालमत्ताधारकांकडून कर भरण्यासाठी आलो होतो पण कर्मचारी नव्हते, अनेक वेळा चकरा माराव्या लागत आहेत असे सांगून थकीत कराचे खापर कर्मचाऱ्यांवरच फोडले जाऊ लागले आहे. सदर प्रकार लक्षात घेऊन पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी प्रभागनिहाय कर वसुली शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये शहरातील सर्व 17 प्रभागातून शिबिरे घेतली जाणार असून प्रत्येक प्रभागातील मालमत्ताधारकांनी त्यांच्या प्रभागात कोणत्या दिवशी शिबीर आहे याची पुर्वकल्पना दिली जाणार आहे. त्यासाठी उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, अभियंता सनोबर तसनीम, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांचे पर्यवेक्षीय पथक स्थापन केले आहे. या शिवाय दररोज सहा प्रभागात शिबीर घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची सहा पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकाकडून प्रभागात जाऊन कर वसुली शिबीर घेतले जाणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून शंभर टक्के कर वसुलीचे उदिष्ट ठेवण्यात आले आल्याचे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले.
हिंगोली शहरातील मालमत्ताधाराकांच्या सोयीसाठी हे शिबिर आयोजित केले आहे. दररोज सहा प्रभागात सकाळी 8 ते 10 यावेळेत शिबिरात कर्मचारी थांबून वसुली करतील. त्यानंतर पालिकेत कामकाजासाठी उपस्थित राहतील. पालिकेच्या कामकाजावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. नागरिकांनी या शिबिरात जास्तीत जास्त कराचा भरणा करावा. - अरविंद मुंडे, पालिका मुख्याधिकारी, हिंगोली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.