आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांची बदली:स्वच्छतेबाबत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याने चर्चेत, अरविंद मुंडे नवे कारभारी

प्रतिनिधी/हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरात स्वच्छतेबाबत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शहराचे नाव राज्यभरात गाजवणाऱ्या पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर अजय कुरवाडे यांची बदली झाली आहे. त्यांचा पदभार अरविंद मुंडे यांनी शुक्रवारी स्वीकारला.

कोरोना काळात चांगली कामगिरी

पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर कुरवाडे यांनी दोन वर्षांपूर्वी हिंगोली पालिकेचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्या काळात त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीमध्येही चांगली कामगिरी केली. कोरोनामध्ये काही काळ निर्बंध उठल्यानंतर शहरातील सर्व नागरिकांना भाजीपाला व इतर साहित्य मिळावे यासाठी शहरांमध्ये तसेच शहरालगतच्या वसाहतींसाठी भाजीविक्री केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे भाजी व साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी टाळता आली.

17 हजारांहून अधिक वृक्ष लागवड

कुरवाडे यांनी पालिकेमध्ये कर वसुलीसाठी प्रभाग निहाय शिबिर आयोजित करून कर वसुली केली. त्यामुळे पालिकेची आर्थिक घडी व्यवस्थित बसवता आली. यासोबतच स्वच्छ शहर सुंदर शहर या उपक्रमांतर्गत पदाधिकारी व नागरिकांच्या सहभागातून शहरात सुमारे 17 हजारापेक्षा अधिक वृक्ष लागवड केली. याशिवाय पाच ठिकाणी घनदाट वृक्ष लागवड केली आहे.

कचऱ्यातून उत्पन्न

कुरवाडे यांनी शहरामध्ये स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवले. वैयक्तिक स्वच्छतागृह बांधकामासोबतच सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकामावर भर देऊन नागरिकांना त्याचा वापर करण्यावर जनजागृती केली. घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत शहरातील सर्व प्रभागातील कचरा घंटा गाडीच्या माध्यमातून गोळा करून त्यावर डम्पिंग ग्राउंड येथे प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही भर पडली आहे.

केंद्र, राज्य शासनाचा पुरस्कार

मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांच्या कार्यकाळात हिंगोली पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत राज्य व केंद्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. हिंगोली शहरात त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. स्वच्छता विषयक नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे हिंगोली पालिकेचे नाव राज्यभरात चांगलेच गाजले.

दरम्यान, मुख्याधिकारी डॉक्टर कुरवाडे यांचे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी बीड जिल्ह्यातील गेवराई पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी आज हिंगोली पालिकेचा पदभार स्वीकारला असून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टर कुरवाडे तसेच नवनियुक्त मुख्याधिकारी मुंडे यांचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...