आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवाळा येथे किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून खून:संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको, आखाडा बाळापूरवासी संतप्त

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे किरकोळ कारणावरून एकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी (दि.1) सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. गौतम नरवाडे (52) असे मयत इसमाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. तर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.

याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळा येथील काही गावकरी शेवाळा नाका येथील हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी बसले होते. यावेळी गौतम नरवाडे देखील तेथे होते. दहा वाजण्याच्या सुमारास गावातील शेख मुस्तफा शेख जिलानी (22) हा तरुण तेथे आला. त्याने मागचा पुढचा विचार न करता गौतम नरवाडे यांच्या पोटात चाकूने तीन वार करून भोसकले त्यानंतर त्यांच्या गळ्यावर वार केला.

किरकोळ कारणावरून वाद
अचानक झालेल्या हल्याने परिसरातील गावकरी घाबरून गेले. या हल्ल्यामध्ये गौतम यांचा जागीच मृत्यू झाला. तर हल्लेखोर तरूण शेख मुस्तफा स्थानकावर येऊन उभा राहिला. किरकोळ कारणावरून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शेख मुस्तफा ताब्यात

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार नागोराव बाभळे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. तर पोलिसांनी शेख मुस्तफा यास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.

गावकऱ्यांशी चर्चा सुरु

या घटनेनंतर शेवाळा येथील गावकरी पोलिस ठाण्यात जमले. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी त्यांनी केली. मात्र पोलिसांनी त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गावकऱ्यांनी आखाडा बाळापूर येथील मुख्य रस्त्यावर ठाण मांडून रास्ता रोको सुरु केला आहे. पोलिस अधिकारी बोधनपोड यांनी गावकऱ्यांशी चर्चा सुरु केली आहे.

बातम्या आणखी आहेत...