आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात सर्वोच्यपद असलेल्या राज्यपालांनी महाराष्ट्राबद्दल चुकीचे वक्तव्यामुळे मराठी भाषिकांच्या मनाला वेदना झाल्या असून त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून राज्यात वाद निर्माण करू नये असे मत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शनिवारी ता. 30 सायंकाळी वसमत येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
वसमत तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजीमंत्री धनंजय मुंडे, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजेश नवघरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांची उपस्थिती होती.
अतिवृष्टीने पिकांचे नुकसान
यावेळी पवार म्हणाले की, राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराच्या अडचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच माहिती आहेत. त्यांनी एक तर तातडीने मंत्रीमंडळ स्थापन करावे अन्यथा त्यांच्या अडचणींची माहिती जनतेला सांगून टाकावी. राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागणार नाही असे चित्र आहे. यापरिस्थितीत शेतकऱ्यांना धिर देण्यासाठी हेक्टरी 75 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली. तसेच शासनाने तातडीने पावसाळी अधिवेशन बोलावून त्यात मदतीची घोषणा करावी अशी मागणी पवार यांनी यावेळी केली.
गैरसमज दूर करावे
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य संभ्रमात टाकणारे आहे. अखंड महाराष्ट्रासाठी शंभर पेक्षा अधिक जणांनी हौतात्म पत्करले आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा राज्याची संस्कृती असून आजपर्यंतचा इतिहास आहे. महाराष्ट्रा विना राष्ट्र न चाले हे त्यांनी लक्षात ठेवावे. विनाकारण चुकीचे वक्तव्य करून वाद निर्माण करू नये. राज्यपालांच्या बोलण्याचा अर्थ कदाचीत वेगळा असेल पण त्यानंतर त्याचे स्पष्टीकरण आले नाही. मात्र अशा प्रकारचे वक्तव्याच्या वेळी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होतात त्यावेळी तातडीने याचे स्पष्टीकरण देऊन गैरसमज दूर केले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.