आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपसंचालकांचे आदेश:नऊ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयीच राहावे लागणार

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी औरंगाबाद येथील बैठकीत मुख्यालयी राहण्याच्या प्रश्नावरून अधिकाऱ्यांना खडसावल्यानंतर रातोरात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मु्ख्यालयी राहण्याचे आदेश आरोग्य उपसंचालक कार्यालयाने काढले आहेत. शनिवारी (ता. ५) पहाटेच अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर आदेश पाठवण्यात आले आहेत. यामुळे मराठवाड्यातील २४०० आरोग्य संस्थांमधील सुमारे ९ हजार आरोग्य अधिकारी व कर्मचारी धास्तावल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यात २४०८ आरोग्य संस्था आहेत. यात ४२५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, तर १९८३ आरोग्य उपकेंद्रांचा समावेश आहे. मात्र अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना आरोग्यसेवा मिळाली नसल्याने गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागत होते. काही ठिकाणी तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासगी दवाखानेही सुरू केल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार तुकाराम मुंडे यांनी घेतल्यानंतर त्यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे मराठवाड्यातील आरोग्य विभागाच्या विभागप्रमुखांची बैठक घेतली. या वेळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. या वेळी काही अधिकाऱ्यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकाऱ्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्याचे सांगितले. मात्र ही कारवाई नाहीच असे सांगत आयुक्त मुंडे यांनी अधिकाऱ्यांनाच चांगलेच धारेवर धरले. यापुढे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहतील याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

तसेच मुख्यालयी न राहणाऱ्यांची माहिती सादर करण्याच्याही सूचना दिल्या. दरम्यान, आयुक्त मुंडे यांच्या सूचनेनंतर बैठक संपल्यानंतर अवघ्या चार तासांतच आरोग्य उपसंचालक कार्यालयाने आरोग्य विभागाच्या विभागप्रमुखांना पत्र पाठवून त्यांच्या अधिनस्थ संस्थेतील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहतात किंवा कसे याची पडताळणी करून प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सर्वांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्याचे आदेशही काढण्यात आले आहेत. शनिवारी पहाटेच हे आदेश अधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर पाठवण्यात आले आहेत.

...तर वेतनही नाही
या वेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते बायोमेट्रिक प्रणालीवरील नोंदीनुसारच अदा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता बायोमेट्रीकवर वेळेवर नोंद नसेल तर वेतन व भत्त्यावरही गदा येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...