आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण सेवेला तंत्रज्ञानाची जोड:आता राज्यातील शाळांच्या 6,170 केंद्रप्रमुखांना मिळणार टॅब; ऑनलाइन माहिती देणे होणार शक्य

मंगेश शेवाळकर | हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांसाठी नेमण्यात आलेल्या ६१७० केंद्रप्रमुखांना समग्र शिक्षा अभियानाच्या वतीने आता टॅब दिला जाणार आहे. त्यामुळे सर्व माहिती ऑनलाइन सादर करता येणार असून टपाली कामातून त्यांची सुटका होणार आहे. शिवाय केंद्र ते राज्यपातळीवर दिली जाणारी माहिती ऑनलाइन भरली जाणार असल्याने ही माहिती तातडीने मिळणे शक्य होणार आहे.

राज्यात ६१७० केंद्रांतर्गत सुमारे ७५ हजार वर प्राथमिक शाळा आहेत. या शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रप्रमुख असून एका केंद्रप्रमुखाकडे सुमारे १० ते १३ शाळा आहेत. या शाळांमधून विद्यार्थ्यांची संख्या, उपस्थिती, पोषण आहार, गणवेश वाटप यासोबतच इतर प्रशासकीय व शैक्षणिक कामे करावी लागतात. वरिष्ठ पातळीवरून मागवलेली माहिती लेखी स्वरूपात तालुका, जिल्हास्तरावर पाठवली जाते. त्यासाठी केंद्रप्रमुखांना शाळांना भेटी देऊन घेतलेली माहिती देण्यासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते. आठवड्यातून किमान तीन-चार वेळा केंद्रप्रमुखांना प्रवास करावा लागताे. शिवाय ही माहिती हाताने नोंदवह्यांत भरावी लागते. यासाठी केंद्रप्रमुखांना शाळेच्या वेळेव्यतिरिक्त अवांतर खूप वेळ द्यावा लागतो.

जिल्हानिहाय पुरवठा केल्या जाणाऱ्या टॅबची संख्या
राज्यात अहमदनगर जिल्ह्यात २९०, अकोला ९७, अमरावती १७५, छत्रपती संभाजीनगर २१०, बीड २०३, भंडारा ८०, बुलडाणा १४२, चंद्रपूर १५०, धुळे १०८, गडचिरोली १३२, गोंदिया १०१, हिंगोली ८५, जळगाव १८४, जालना १४२, कोल्हापूर २१७, लातुर १६३, मुंबई ३९, बृहन्मुंबई १४६, नागपूर १९९, नंदुरबार ११४, नाशिक ३१३, धाराशिव ११५, परभणी ११४, पालघर १७१, पुणे ३७५, रायगड २२८, रत्नागिरी २५१, सांगली १६५, सातारा २३२, सिंधुदुर्ग १४४, सोलापूर २८०, ठाणे १९८, वर्धा ८८, वाशिम ७८, यवतमाळ जिल्ह्यात २०८ टॅब दिले जाणार आहेत.

सततचा प्रवास करणे टळणार
केंद्रप्रमुखांचा वेळ लिखाणकाम व प्रवासातच जात असल्यामुळे शाळेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र होते. यामुळे समग्र शिक्षा अभियान कार्यालयाने राज्यातील केंद्रप्रमुखांना टॅब देण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात एका कंपनीला टॅब पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले असून काही दिवसांतच टॅब हाती येतील. त्यामुळे केंद्रप्रमुखांची कामे अधिक गतीने होणार आहेत.

सरल पोर्टलसह इतर माहितीची सहज नोंद
केंद्रप्रमुखांना दिल्या जाणाऱ्या टॅबमध्ये मॉनिटरिंग सिस्टिम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या चाचण्या, शाळेतील शिक्षकांबद्दलची माहिती, शाळेतील सुविधा, यूडायस, नॅस, सरल पोर्टलवर माहिती नोंदवण्यासाठी उपयोग होईल.

  • शैक्षणिक कामांना येणार गती राज्यात ७५ हजारांहून अधिक प्राथमिक शाळा, एका केंद्रप्रमुखाकडे सध्या आहे १० ते १३ शाळांची जबाबदारी.
  • शाळांना भेटी देऊन केंद्रप्रमुखांना दैनंदिन नोंदी घेण्यासाठी आठवड्यातून तीन-चार वेळा करावा लागणारा प्रवास आता टळणार