आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात ९४,८८६ अंगणवाड्यांपैकी केवळ ३२ टक्के म्हणजेच ३०,९५८ अंगणवाड्यांमध्येच वीजपुरवठा सुरू आहे. उर्वरित तब्बल ६३,९२८ अंगणवाड्यांमधून आकार हा प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रम शिकवण्यासोबतच अंगणवाड्या डिजिटल होण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानंतर आता डीपीसीच्या निधीतून अंगणवाड्यांना अपारंपरिक पद्धतीने वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत १.१० लाख अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात ८१,८७५ अंगणवाडी केंद्र, तर १३,०११ मिनी अंगणवाडी केंद्र असे ९४,८८६ अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. यामधून सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक बालके शिक्षण घेतात. या अंगणवाड्यांमधून विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. त्यातून कुपोषित बालकांकडे विशेष लक्ष दिले जाते. यासोबतच अंगणवाड्यांमधून पूर्व शालेय शिक्षण दिले जाते. या माध्यमातून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. त्यामध्ये आकार हा अभ्यासक्रमदेखील शिकवला जातो. या अभ्यासक्रमाचे दर महिन्याचे टाचन वरिष्ठ कार्यालयाकडून दिले जाते. त्यानुसार बालकांना त्यांना झेपेल अशा पद्धतीनेच माहिती दिली जाते.
दत्तक अंगणवाड्यांनाही गावस्तरावर प्रतिसाद नाही : एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने दत्तक अंगणवाडी उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी गावातील दानशूरांचा शोध घेऊन त्यांच्याकडून अंगणवाडीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून घेण्याचे कळवण्यात आले होते. मात्र या योजनेला गावस्तरावर प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे दानशूरांचा शोध घेतांना प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे.
राज्यातील ६३,९२८ अंगणवाड्यांमधून विजेचा लखलखाट करण्यासाठी जिल्हा नियोजनच्या सर्वसाधारण निधीतून राखीव ठेवल्या जाणाऱ्या ३ टक्के निधीचा वापर केला जाणार आहे. यामधून अंगणवाडीला वीजपुरवठा करण्याचे प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे सादर करून मंजूर करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातून या अंगणवाड्या आता विजेच्या दिव्यांनी लखलखणार आहेत.
आकारमधून संख्या ज्ञानासह इतर माहिती राज्यातील अंगणवाड्यांमधून आकार अभ्यासक्रमात संख्याज्ञान, मुळाक्षरे, प्राणी, पक्षी यांची नावे याची माहिती दिली जाते. त्यासाठी सर्व चार्टदेखील तयार करण्यात आले आहेत. काही अंगणवाड्यांमधून इमारतीच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत. या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते.
पंखा, पाणी दिव्यासाठी आहे वीजपुरवठ्याची गरज
राज्यातील ६३,९२८ अंगणवाड्यांमधून वीजपुरवठा नाही. त्यामुळे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी गाणी, बालचित्रे, बाल शैक्षणिक अभ्यासक्रम याचा वापर कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र त्यावरही काही ठिकाणी मात करून बालकांना शिक्षण दिले जाते. मात्र पंखा, विजेवरील दिवे, पिण्याची पाणी यासाठी वीजपुरवठ्याची गरज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.