आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे येथे आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर झालेल्या हल्ला प्रकरणात शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांना पुणे पोलिसांनी बुधवारी (ता. 3) पहाटे साडेपाच वाजता मुंबईतील काळाचौकी पोलिस ठाण्यातून ताब्यात घेतले आहे. यासह सामंतांच्या वाहनावरील हल्ला प्रकरणी 6 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली.
तत्पुर्वी थोरात यांची पुणे येथे आणले गेले तर दुसरीकडे पोलिसांची ही कारवाई सुडबुध्दीची असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. त्यांच्यासह पुण्यात शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली.
चिथावणीनंतर हिंगोलीत गुन्हा
हिंगोली येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात 1 ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी गद्दारांची वाहने फोडल्यास त्यांचा पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. या प्रकरणात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे येथे मंगळवारी सायंकाळी आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेला बबनराव थोरात यांना जबाबदार धरले जात आहे. त्यांना मंगळवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास मुंबई येथील काळाचौकी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांना तेथेच थांबवून त्यांची चौकशी करण्यात आली. तर आज पहाटे साडेपाच वाजता पुणे येथील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या पथकाने काळाचौकी पोलिस ठाण्यात येऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस त्यांना घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहेत.
पोलिसांची कारवाई सुडबुध्दीची- बबनराव थोरात, शिवसेना हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख
पुणे येथे आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला त्यावेळी आपण मुंबईत होतो. या प्रकरणात आपला कुठल्याही प्रकारचा संबंध नसतांना पोलिसांनी आपल्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. आता पोलिस काय चौकशी करणार हे पहावे लागणार आहे. तर पोलिसांची हि कारवाई सुडबुध्दीची आहे.
बबनरावांचे ते वक्तव्य
शिवसेनेच्या बळावर आमदार झालेल्यांनीच पाठीत खंजीर खुपसला आहे. आता यांना रोखण्यासाठी आपल्याला गावा गावात उभे रहावे लागणार आहे. प्रत्येकाने आता पासूनच कामाला लागावे. शिवसेेनेच्या हिंगोली जिल्हा प्रमुख पदासाठी इच्छुक असलेल्यांनी त्यांच्या गावात गद्दारांच्या गाड्या आल्यास फोडण्याचे आवाहन करून गाड्या फोडणाऱ्यांचा मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
काल सामंतांच्या गाडीवर हल्ला
शिवसेनेचे बंडखोर आमदार व माजी मंत्री उदय सामंत हे मंगळवारी दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दौऱ्यात फिरत होते. रात्री सव्वा नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कात्रज परिसरात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली. तेथून जवळच बंडखोर नेते तानाजी सावंत यांचे निवासस्थान आहे. त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार होते. याकरीता तानाजी सावंत व उदय सामंत कात्रज परिसरातून जात असताना त्यांना शिवसैनिकांच्या रोषास सामोरे जावे लागले. शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकीत उदय सामंत यांच्या कारची काच फुटली. यामुळे कात्रज परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. 'गद्दारांना माफी नाही', असे म्हणत शिवसैनिकांनी उदय सामंत यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांनी त्यांची गाडी सुखरूपपणे बाहेर काढत त्यांना पुढे नेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.