आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यातील आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण होत असल्याचे सांगितले जात असले तरी ३५४ पैकी तब्बल ११४ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांत ऑक्सिजन बेडच उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या रेफरचे प्रमाण वाढले आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी ३७ ठिकाणी पोस्टमाॅर्टेम रूमच नाही. त्यामुळे उघड्यावर शवविच्छेदन केले जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तर पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही.
राज्यात कोविडमुळे आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. विशेषतः कोविडच्या काळात ऑक्सिजन बेडची कमतरता भासली. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याचे आरोग्य विभागाचे प्रयत्न होते. याशिवाय आरोग्य केंद्राच्या परिसरात स्वच्छता करून गार्डन विकसित करणे, वाचनीय पुस्तके उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मराठवाड्यात एकूण ३५४ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ५१, जालना ४०, परभणी ३१, हिंगोली २४, बीड ५०, लातूर ४६, नांदेड ६८ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ४४ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. मात्र यापैकी ३३८ ठिकाणी एक्स-रे मशीनच उपलब्ध नाही. १४ ठिकाणी ऑपरेशन टेबल नसल्यामुळे किरकोळ शस्त्रक्रिया करण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. तसेच ४३ ठिकाणी वॉर्मर किट नाही तर ११ प्राथमिक आरोग्य केंद्रात पॅथालॉजी लॅब नसल्यामुळे रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीचा प्रश्न कायम आहे. विशेष म्हणजे ३७ ठिकाणी शवविच्छेदनगृहच नसल्यामुळे उघड्यावरच शवविच्छेदन करावे लागत आहे. याशिवाय ४१ ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी नाही, तर ८८ ठिकाणी गार्डन तयार केलेले नाही.
मराठवाड्यात अशी आहे सुविधांची वानवा
पल्स ऑक्सिमीटर : जालन्यात १६ ठिकाणी उपलब्ध नाही.
ऑपरेटिव्ह टेबल : हिंगोली २, बीड १ तर नांदेड जिल्ह्यात ११ ठिकाणी ऑपरेटिव्ह टेबल नाही.
वॉर्मर : औरंगाबाद ११, जालना १४, नांदेड ११, बीड ७ ठिकाणी वॉर्मर नाही.
शवविच्छेदनगृह : औरंगाबाद ७, जालना ५, बीड १२, नांदेड ११, उस्मानाबाद २ ठिकाणी शवविच्छेदनगृह नाही.
पिण्याचे पाणी : जालना २७, हिंगोली १४ ठिकाणी पिण्याच्या पाण्याची वानवा.
एक्स-रे मशीन : नांदेड जिल्ह्यात १६ प्राथमिक आरोग्य केंद्रे वगळता इतर ठिकाणी एक्स-रे मशीन नाही.
ऑक्सिजन बेड : औरंगाबाद ४४, जालना ३९, परभणीत ३१ ठिकाणी ऑक्सिजन बेड नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.