आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी बसची दुचाकीला धडक:तरुण जागीच ठार, दुसरा गंभीर, आखाडा बाळापूर ते डोंगरकडा मार्गावर भाटेगाव शिवारातील घटना

हिंगोली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आखाडा बाळापूर ते डोंगरकडा मार्गावर भाटेगाव शिवारात भरधाव खासगी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. 19) सायंकाळी घडली आहे. गजानन देविदास लोमटे (32, रा. चुंचा) असे मृताचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

धार्मिक कार्यक्रमानंतर घरी जाताना अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथील गजानन लोमटे हे डोंगरकडा येथील भाऊराव सहकारी साखर कारखाना येथे कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. आज सायंकाळच्या सुमारास गावातील धार्मिक कार्यक्रम आटोपून गजानन लोमटे हे त्यांच्या मित्रासह दुचाकी वाहनावर डोंगरकडा येथे कारखान्यावर जाण्यासाठी निघाले होते.

​​​​​​​काही काळ वाहतूक ठप्प

वारंगा फाटा ते डोंगरकडा मार्गावर भाटेगाव शिवारात नांदेडकडून भरधाव वेगात येणाऱ्या खाजगी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गजानन यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर वारंगा ते नांदेड मार्गावरील वाहतुक ठप्प झाले होती.

जखमीवर नांदेडमध्ये उपचार

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार शेख बाबर, जमादार प्रभाकर भोंग यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर चुंचा व वारंगा येथील गावकऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन जखमीला खाजगी वाहनाने उपचारासाठी नांदेडला हलविले आहे. त्यानंतर या मार्गावरील वाहतुक सुरळीत केली. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात रात्री उशीरा पर्यंत नोंद झाली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...