आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात नवीन ११ वैद्यकीय महाविद्यालयांसह त्यांना संलग्नित ४३० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त कार्यालयाने आरोग्य विभागाकडे सादर केला आहे. त्यासाठी सुमारे ५,३३५ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. यामुळे या जिल्ह्यांमधून रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहे. यामध्ये हिंगोलीसह जालना, पालघर, गडचिरोली, अमरावती, वाशिम, बुलडाणा, अंबरनाथ अहमदनगर, भंडारा, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्यात सद्य:स्थितीत ५७ वैद्यकीय महाविद्यालये असून त्यांची विद्यार्थी प्रवेश क्षमता ९,००० एवढी आहे. मात्र सध्याच्या स्थितीत लोकसंख्या वाढ व राज्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार केल्यास नवीन वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्नित रुग्णालय मंजूर करणे आवश्यक बनले होते. त्यासोबतच विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाची सोय व्हावी यासाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करणे गरजेचे झाले होते. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय सुरू झाल्यास त्या भागातील जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे. त्यासाठी या वैद्यकीय महाविद्यालयासोबतच रुग्णालय मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. याशिवाय त्या त्या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या जागेची माहितीदेखील या प्रस्तावात नमूद केली आहे. त्यानुसार या ठिकाणी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी चार वर्षात ५३३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
१५,७७४ मनुष्यबळ उपलब्ध होणार या ठिकाणी रुग्णालयासाठी वर्ग १ ची एकूण ३३ पदे, वर्ग २ ची एकूण १५४ पदे, वर्ग ३ ची एकूण ५५३३ पदे, वर्ग ३ ची एकूण काल्पनिक पदे ४०७, वर्ग ४ ची कंत्राटी एकूण पदे ४७१९ पदांचा समावेश आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठी वर्ग १ ची एकूण ५२८ पदे, वर्ग २ ची एकूण ४८६ पदे, विद्यावेतन एकूण पदे ६४९ पदे, वर्ग ३ ची एकूण १०२३ पदे, वर्ग ३ ची बाह्यस्राेताद्वारे १५२९ पदे, वर्ग ४ ची एकूण ७१५ पदांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.