आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर दूध सांडून शासन, प्रशासनाचा निषेध:हिंगोलीत पीकविम्यासाठी स्वाभिमानीचे आंदोलन पाचव्या दिवशी सुरुच

प्रतिनिधी | हिंगोली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन आणखी तीव्र केले आहे. संघटनेने आज सकाळी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे रस्त्यावर दूध सांडून शासन व प्रशासनाचा निषेध केला. तर, दुसरीकडे चर्चेसाठी आलेल्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांसोबतची चर्चा फिस्कटली आहे.

या आहेत मागण्या

हिंगोली जिल्ह्यातील पीकविमा भरलेल्या सुमारे 3 लाख शेतकऱ्यांना विमा संरक्षित रक्कम तातडीने द्यावी, मागील वर्षीचे १३.८९ कोटी रुपये द्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागील पाच दिवसांपासून गोरेगावच्या अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे, गजानन शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

आंदोलनाचे लोण जिल्हाभर

या आंदोलनास पाठिंबा म्हणून भगवती (ता.सेनगाव) येथील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. त्यानंतर गोरेगाव –जिंतुर रस्त्यावर टायर जाळून निषेध केला. त्यानंतर रविवारी हिंगोलीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या फलकावर काळा रंग फेकला. तसेच गोरेगाव, सेनगाव व हिंगोली येथे बंदला अंशतः प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आज सकाळी गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध सांडून शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून कॅटलीमधील दुध रस्त्यावर सांडून निषेध केला. आता हळुहळु या आंदोलनाचे लोण जिल्हाभरात पोहोचू लागले आहे.

पीकविम्याची रक्कम पोहोचलीच नाही

दरम्यान, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे हे आंदोलनकर्त्यांशी चर्चेसाठी आले होते. मात्र आपणच १५ दिवसांत पिकविम्याचा प्रश्‍न निकाली काढू असे लेखी आश्‍वासन दिले. मात्र या मुदतीत पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलीच नाही. त्यामुळे आपणास चर्चेचा अधिकार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. आता तुम्हाला शेतकऱ्यांचा जीव हवा असेल तर तसेच सांगा. आम्ही जीव द्यायलाही तयार असल्याचे गजानन कावरखे यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांची आक्रमक भुमिका पाहून घोरपडे यांनी काढता पाय घेतला अन चर्चा फिस्कटली.

बातम्या आणखी आहेत...