आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापूर्णा ते हिंगोली रेल्वेमार्गावर विद्युत इंजिन असलेली रेल्वे १०० किमी प्रतितास या वेगाने धावली. या रेल्वेमार्गावर गुरुवारी (२ मार्च) सायंकाळी विद्युत इंजिनची यशस्वीपणे चाचणी झाल्याचा दावा रेल्वे खात्याने केला आहे. त्यामुळे पुढील काळात पूर्णा ते अकोला रेल्वेमार्गावर विद्युत इंजिनच्या रेल्वे धावणार आहेत. डिझेल इंजिनमुळे रेल्वेगाड्यांची वेगमर्यादा ४५ ते ६० किलोमीटर प्रतितास अशी आहे. पण विद्युतीकरणामुळे हा वेग आता १०० किमी प्रतितास असा वेग असेल.
पूर्णा ते अकोला या सुमारे २०९ किमी रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाचे काम मंजूर करण्यात आले होते. त्यासाठी सुमारे २५० कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला. सुरुवातीला अकोला ते हिंगोली या रेल्वेमार्गावर टप्प्याटप्प्याने विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर २४ सप्टेंबर २०२२ पर्यंत त्याची चाचणीही घेण्यात आली. त्यानंतर हिंगोली ते पूर्णा या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाला गती देण्यात आली. या विद्युतीकरणासाठी ठिकठिकाणी खांब उभारण्यात आले असून २५,००० व्होल्टच्या विद्युत वाहिन्या उभारल्या आहेत. या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी पूर्णा येथून विद्युत इंजिन असलेल्या १० डब्यांच्या रेल्वेद्वारे चाचणी करण्यात आली.
प्रवाशांचा त्रास हाेईल कमी : हिंगोली रेल्वे मार्गावरून श्रीगंगानगर, कुर्ला, अमृतसर, नागपूर, जम्मू तावी, जयपूर, तिरुपती कोल्हापूर, हैदराबाद या लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. मात्र बहुतांश वेळी या गाड्या उशिराने धावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हिंगोली सह वाशिम, अकोला, पूर्णा, वसमत या भागातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सध्या सुरू असलेल्या डिझेल इंजिन मुळे रेल्वे गाड्यांची वेगमर्यादा ४५ ते ६० किलोमीटर प्रति तास अशी आहे.
चाचणी यशस्वीचा दावा रेल्वे हिंगोलीत पोहोचल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते गणेश साहू यांनी मीना यांच्यासह इंजिन चालक जितू कुमार, कपिल सरदार, स्वप्निल गजभिये, विक्की कुमार, दीपक रंजन, सर्वेश्वर राव यांचा सत्कार केला. या वेळी स्टेशन मास्तर रामसिंग मीना, अश्विनीकुमार, संजीवकुमार, पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते. त्यानंतर रेल्वे परत पूर्णाकडे रवाना झाली. दरम्यान, विद्युत इंजिनची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा रेल्वे विभागाने केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.