आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोलीत काँग्रेसमधील गटबाजी सर्वश्रृत आहे, त्यानंतर आता खा. राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या तोंडावरही ही गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. तसेच काँग्रेस नेते वरवर एकत्र असल्याचे दाखवित असले तर प्रत्यक्षात कृती मात्र वेगळी असल्याचे दिसू लागले आहे. यात्रेच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या दोन रॅली याचेच द्योतक मानले जात आहे.
हिंगोली जिल्हयात काँग्रेसमधील गटबाजी सर्वश्रृत आहे. वरिष्ठ नेत्यापर्यंत गटबाजीचा विषय पोहोचला आहे. माजी खासदार राजीव सातव यांनी जिल्हयातील काँग्रेसच्या नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची एकत्रीत मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर गटबाजीला पुन्हा तोंड फुटले होते.
जिल्हयात आमदार भाऊराव पाटील गोरेगाव व माजी खासदार राजीव सातव यांचा गट असे दोन गट पडले होते. तर माजी पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी माजी खासदार सातव यांच्याकडे झुकते माप ठेवले होते. मात्र माजी खासदार सातव यांच्या निधनानंतर सातव कुटुंबांचे राजकिय पुनर्वसन करण्यासाठी विधान परिषदेचे उमेदवारी डॉ. प्रज्ञा सातव यांना द्यावी अशी एका गटाची मागणी असतांना माजी पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी त्यांच्या परभणीच्या समर्थकाचे नांव पुढे केल्याने डॉ. सातव प प्रा. गायकवाड यांच्यातही वाद निर्माण झाला. मात्र, या परिस्थितीत डॉ. सातव यांना काँग्रेसने उमेदवारी देऊन त्यांची जागा बिनविरोध निवडून आणली.
दरम्यान, कळमनुरीत माजी खासदार सातव यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम तत्कालीन पालकमंत्री प्रा. गायकवाड यांच्या हस्ते होणार होता. मात्र नियोजीत वेळेपुर्वीच आमदार डॉ. सातव यांनी उद्घाटन कार्यक्रम उरकून घेतला अन् त्यानंतर आलेल्या प्रा. गायकवाड यांची साधी विचारपूसही केली नाही.
दरम्यान, आता काँग्रेस नेते खा. राहुल गांधी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हयात चार दिवस मुक्काम आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीसाठी काँग्रेस नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र यासाठी आमदार डॉ. सातव यांनी हिंगोली दुचाकी रॅली काढली. या रॅलीमध्ये माजी आमदार गोरेगावकर यांचे कार्यकर्ते सहभागी झालेच नाहीत. तर त्यानंतर सोमवारी ता. 7 माजी आमदार गोरेगावकर यांनी दुचाकी रॅली काढली. एकाच कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या दोन रॅलीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे प्रा. गायकवाड हिंगोलीत ठाण मांडून आहेत. त्यांनी मात्र वसमत भागात जाऊन यात्रेची माहिती देण्यास सुरवात केली असून गटा-तटाच्या राजकारणात सावध पवित्रा घेतला आहे. खा. राहूल गांधी यांच्या दौऱ्यात हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचे मनोमिलन होणार का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.