आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कचरा टाकायची सवय बदलण्यासाठी वाचन कट्टा

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील कचरा पॉइंट शोधून त्या ठिकाणी कचरा निर्मूलनासाठी पालिकेने चक्क वाचन कट्टाच सुरू केला आहे. या ठिकाणी विविध पुस्तके तसेच वाचनीय साहित्य ठेवले आहे. त्यामुळे या ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचे निर्मूलन होणार आहे. उपक्रम सुरू केल्यानंतर एकाच दिवसात कचरा हाेणाऱ्या ठिकाणी अाता पूर्ण जागा स्वच्छ राहत असल्याचे दिसते.

हिंगोली पालिकेकडून नवीन उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्यातून शहर स्वच्छतेवर तसेच वृक्ष लागवड करून हरित शहरावर भर दिला जात आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्व निकष पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, अभियंता रत्नाकर अडशिरे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्या पथकाने दोन दिवसांपूर्वीच शहरातील मुख्य मार्गाची पाहणी केली होती. यामध्ये काही ठिकाणी दररोज कचरा आणून टाकला जात असल्याचे दिसून आले. घंटागाडी सुरू असतानाही तीन ठिकाणी कचरा साठत असल्याचे दिसून आल्यामुळे त्याला आवर घालण्यासाठी पालिकेने कचरा टाकणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्या ठिकाणी वाचन कट्टा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार अग्निशमन दल कार्यालयाच्या बाजूला, पोस्ट ऑफिस रोड तसेच शासकीय रुग्णालयाच्या मार्गावर वाचन कट्टा सुरू केला. दरम्यान, या वाचन कट्ट्याचे उद्घाटन आमदार तान्हाजी मुटकुळे, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, कंत्राटदार मयूर कयाल, फर्टिलायझर संघटनेचे विभागीय पदाधिकारी आनंद निलावार, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी पंकज अग्रवाल यांच्या उपस्थितीत झाले. शहरातील कचरा पॉइंटवर वाचन कट्टा सुरू केल्यामुळे त्या ठिकाणी कचरा टाकणे बंद झाले आहे. नागरिकांनी या कट्ट्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी केले आहे.

मुबलक वाचन साहित्य ज्येष्ठ नागरिक तसेच इतरांना बसण्यासाठी टेबलची व्यवस्था केली आहे. तेथे विविध पुस्तके तसेच वाचनीय साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यातून सदर तिन्ही पाॅइंट कचरामुक्त होणार असून ज्येष्ठ नागरिकांनाही बसण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे. त्यातून वाचन संस्कृती वाढवण्याचे प्रयत्नही पालिकेने सुरू केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...