आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा पॉईंटवर सुरू केला वाचन कट्टा:कचरा निर्मुलनासाठी हिंगोली पालिकेचा अनोखा  फंडा, वाचन संस्कृती वाढविण्यास मदत होणार

प्रतिनिधी | हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील कचरा पॉईंट शोधून त्या ठिकाणी कचरा निर्मुनलानासाठी पालिकेने चक्क वाचन कट्टाच सुरु केला आहे. या ठिकाणी विविध पुस्तके तसेच वाचनिय साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचे निर्मुलन होणार आहे. स्वच्छतेसाठी पालिकेचा हा फंडा जिल्हाभरात चर्चेचा विषय बनला आहे.

हरीत शहरावर भर

हिंगोली पालिकेने मागील काही वर्षात स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला चांगली गती दिली आहे. विशेष म्हणजे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सातत्य राखून नवीन उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्यातून शहर स्वच्छतेवर तसेच वृक्षलागवड करून हरीत शहरावर भर दिला जात आहे. तसेच, स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्व निकष पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

तीन ठिकाणी वाचन कट्टा

पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, अभियंता रत्नाकर अडशिरे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्या पथकाने दोन दिवसांपुर्वीच शहरातील मुख्य मार्गाची पाहणी केली होती. यामध्ये काही ठिकाणी दररोज कचरा आणून टाकला जात असल्याचे दिसून आले. घंटागाडी सुरु असतांनाही तीन ठिकाणी कचरा साठत असल्याने त्याला आवर घालण्यासाठी पालिकेने कचरा टाकणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्या ठिकाणी वाचन कट्टा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार शहरातील अग्निशमनदल कार्यालयाच्या बाजूला, पोस्ट ऑफीस रोड तसेच शासकीय रुग्णालयाच्या मार्गावर वाचन कट्टा सुरु केला आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरीक तसेच इतरांना बसण्यासाठी टेबलची व्यवस्था करण्यात आली असून तेथे विविध पुस्तके तसेच वाचनिय साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यातून तीनही पाॅईंट कचरामुक्त होणार असून जेष्ठ नागरीकांनाही बसण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे. तर वाचन संस्कृती वाढविण्याचे प्रयत्नही पालिकेने सुरु केले आहेत.

दरम्यान, या वाचन कट्टयाचे उदघाटन आमदार तान्हाजी मुटकुळे, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, कंत्राटदार मयुर कयाल, फर्टीलायझर संघटनेचे विभागीय पदाधिकारी आनंद निलावार, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी पंकज अग्रवाल यांच्या उपस्थितीत झाले.

नागरीकांनी याचा लाभ घ्यावा

शहरातील कचरा पॉईंटवर वाचन कट्टा सुरु केल्यामुळे त्या ठिकाणी कचरा टाकणे बंद झाले आहे. शिवाय जेष्ठ नागरीकांना बसण्यासाठी तसेच वाचन करण्यासाठी मुख्य रस्त्यालगत जागा मिळाली आहे. नागरीकांनी या कट्ट्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंगोली पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...