आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदाभाऊ खोतांचा शरद पवारांना टोला:म्हणाले - ऊस हे आळशी शेतकऱ्यांचे पीक म्हणणाऱ्यांचे राजकारण ऊस शेतीवरच फुलले

हिंगोली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात उसाचे पिक आळशी शेतकऱ्याचे पीक असल्याचे म्हणणाऱ्या खासदार शरद पवार यांचा राजकारणाचा मळा ऊस शेतीवर फुलला असून त्यांच्या नातेवाईकांनी कवडीमोल दराने साखर कारखाने खरेदी केल्याचा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज हिंगोलीत बोलताना केला आहे. शरद पवारांनी 17 एप्रिल रोजी राज्यातील अतिरिक्त ऊसाच्या मुद्द्यावरून हे वक्तव्य केले होते.

ठाकरे सरकारवर घणाघात

जागर शेतकऱ्याचा आक्रोश महाराष्ट्राचा या शेतकरी संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंगोली पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना खोत म्हणाले की, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्याची मागणी केली होती. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक राहील याची कल्पनाही शासनाला देण्यात आली होती. मात्र ऊसाचे टीपरू गाळपा अभावी शिल्लक राहू देणार नाही असे सांगणाऱ्या महाविकास आघाडीचे ऊस गाळपाचे नियोजन फिस्कटले आहे. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहे. महाविकास आघाडी सरकारचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोप खोत यांनी केला आहे.

शरद पवारांवर सदाभाऊ खोत यांचे टीकास्त्र

ऊस हे पीक आळशी शेतकऱ्यांचे पीक असल्याचे म्हणणाऱ्या खासदार शरद पवार यांच्या राजकारणाचा मळा ऊस शेतीतून फुलला आहे. ऊस हे पीक आळशी शेतकऱ्यांचे पीक असेल तर पवारांच्या नातेवाईकांनी अनेक साखर कारखाने कवडीमोल दराने का विकत घेतले हेसुद्धा जनतेला सांगण्याची गरज असल्याचे खोत यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकार चालवण्यात अपयशी

राज्यात फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी आडवले त्यातून अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला. मात्र महाविकास आघाडी सरकारने ही योजना गुंडाळून पैसा अडवा पैसा जिरवा ही योजना सुरू केल्याचा आरोप खोत यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे आश्वासन देणाऱ्या महाविकास आघाडीने सातबारा कोरा केलाच नाही. शेतकऱ्याला मागील दोन वर्षात पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तब्बल 90 लाख टनाहून अधिक उसाचे गाळप शिल्लक आहे. असे असताना शरद पवार यांनी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झालाच कशामुळे हे एका वाक्यात सांगून ऊस उत्पादकांना एक सल्ला दिला होता. ऊस हे आळशी माणसाचे पीक आहे. म्हणजेच एकदा लागण झाली की अधिकचे कष्ट नाहीत की हात मशागत नाही. लागवडीपासून, सिंचन, मशागत आणि तोडणी देखील यंत्राच्या सहाय्याने होते. त्यामुळे ऊस हे आळशी माणसांचे पीक आहे. दराचा विचार न करता उत्पादन घेण्यास सोपे असल्याने शेतकऱ्यांचा याकडे कल वाढत आहे. असे शरद पवारांनपी म्हटले होते. तर शेतकऱ्यांनी ऊस घेण्यापेक्षा हंगामी पिकांसह फळबागांची लागवड करण्याचा सल्ला शरद पवारांनी अतिरिक्त ऊस उरल्याने उत्पादकांना दिला होता.

बातम्या आणखी आहेत...