आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात नऊ जिल्ह्यांमधून स्वच्छता दिंडी सहभागी होणार आहे. या दिंडीतील कर्मचारी स्वच्छतेचे महत्त्व, पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाच्या पाण्याच्या संकलनाचे महत्त्व वारकऱ्यांना पटवून देणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात पालखी सोहळ्याच्या आगमनापासून ते जिल्ह्याच्या सीमेपर्यंत स्वच्छता दिंडीतील कर्मचारी सहभागी राहणार आहेत.
राज्यात कोविडच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांच्या खंडानंतर या वर्षी राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे पोहोचणार आहेत. पालखी सोहळे आपापल्या ठिकाणावरून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.दरम्यान, या पालखी सोहळ्यातील सहभागी वारकऱ्यांमध्ये स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून पाण्याचा काटकसरीने वापर व स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. त्यासाठी ९ जिल्ह्यांनी स्वच्छता दिंडी काढण्याच्या सूचना स्वच्छ भारत मिशन विभागाच्या संचालकांनी दिल्या आहेत. पालखी सोहळा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत तयार केलेल्या स्वच्छता दिंडीतील कर्मचारी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना स्वच्छता आणि आरोग्यविषयक योजनांची माहिती देणार आहे. यासोबतच स्वच्छतागृहाचा वापर, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा वर्गीकरण तसेच कचऱ्याचे संकलन करून त्यापासून खत तयार करणे, परसबागा यावर जनजागृती केली जाणार आहे.
१६ जून रोजी हिंगोली जिल्ह्यात दाखल होणार
श्रीक्षेत्र शेगाव येथून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी (ता. १६ जून) हिंगोली जिल्ह्यात दाखल होणार आहे. या पालखी सोहळ्यात सातशे वारकरी सहभागी झाले आहेत. मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पानकनेरगाव येथे या पालखी सोहळ्याचे स्वागत होईल. त्यानंतर पालखी सोहळा नरसी नामदेव, डिग्रस कऱ्हाळे, औंढा नागनाथ, हट्टामार्गे १९ जून रोजी परभणी जिल्ह्यात जाणार आहे.
या जिल्ह्यांना देण्यात आल्या सूचना
स्वच्छ भारत मिशन अभियान कक्षाच्या प्रकल्प संचालक कार्यालयाने राज्यातील अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, औरंगाबाद, अमरावती, सांगली, सातारा या जिल्ह्यांना पत्र पाठवून स्वच्छता दिंडी काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांची तयारी सुरू
हिंगोली जिल्ह्यातून विदर्भातील सुमारे ८० ते १०० पालखी सोहळे जातात. त्यामुळे हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता दिंडी तयार केली जात आहे. या स्वच्छता दिंडीमध्ये स्वच्छ भारत मिशनचे रघुनाथ कोरडे, श्यामसुंदर मस्के, प्रथमेश धोंगडे, राधेश्याम गंगासागर, राजेंद्र सरकटे, किशोर पडोळे, रेणुकादास कठारे, अमोल देशपांडे, बाळासाहेब देशमुख यांच्यासह तालुकास्तरावरील कर्मचारी सहभागी होणार आहेत.
डिग्रस कऱ्हाळेच्या गावकऱ्यांची लगबग सुरू
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे या पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत होते. सोहळ्याच्या मार्गावर रांगोळ्या काढल्या जातात. आरतीनंतर प्रसादाचा कार्यक्रम होतो. दिंडीच्या स्वागतासाठी गावकऱ्यांची तयारी सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.