आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हिंगोलीतील महाविद्यालयाच्या प्राचार्यांना संतोष बांगर यांनी मारहाण केली आहे.
प्राचार्यांचा कानच पकडला
3-4 दिवसांपूर्वीच्या घटनेचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. व्हिडिओत हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर हे मारहाण करत आहेत. संतोष बांगर यांनी प्राचार्यांचा कानच पकडला आहे. केवळ आमदार संतोष बांगरच नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा प्राचार्यांचा कान पकडत त्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
मारहाणीचे कारण अद्याप स्पष्ट
आमदार बांगर यांनी महाविद्यालयात जाऊन प्राचार्याला मारहाण का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. डॉक्टर अशोक उपाध्याय असे आमदार संतोष बांगर यांनी मारहाण केलेल्या प्राचार्यांचे नाव आहे. डॉ. अशोक उपाध्याय हे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक महिलांना त्रास देतात, असा आरोप करत बांगर यांनी त्यांना मारहाण केल्याची माहिती आहे. मात्र, यावर अद्याप संतोष बांगर यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
संतोष बांगर यापूर्वीही वादात
या संपूर्ण प्रकारामुळे आमदार संतोष बांगर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. संतोष बांगर यांनी यापूर्वीही पोलिस कर्मचारी तसेच काही अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व मारहाण केल्याचे समोर आले आहे. लोकप्रतिनिधी असूनही संतोष बांगर वारंवार कायदा आपल्या हातात घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा मांडला होता. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आपले मंत्री, आमदारांना आवर घाला, अशी सूचना केली होती. त्यानंतरही अशा घटना समोर येत आहे.
मंत्रालयातील पोलिस शिपायाला दिली होती धमकी
संतोष बांगर यांनी मंत्रालयातील पोलिस शिपायालाही धमकी दिली होती. 3 नोव्हेंबर, 2022 रोजी ही घटना घडली होती. यादिवशी आमदार बांगर 25 समर्थकांसह गुरुवारी मंत्रालयात प्रवेश करत असताना तेथे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवले. सोबतच्या कार्यकर्त्यांनी पास काढावा, अशी सूचना पोलिस शिपायाने केली होती. त्यामुळे संतापलेल्या आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ केली. 'माझ्याकडे पिस्तूल असते, तर तुम्हाला गोळ्या घातल्या असत्या,' अशी धमकीही त्यांनी दिल्याचे समजते. याबाबत संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने मंत्रालय पोलिस नियंत्रण कक्षाच्या दैनंदिन डायरीमध्ये याबाबत रात्री नोंद केली. या नोंदीचे पडसाद मंत्रालयात उमटले होते. वाचा सविस्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दिली होती समज
मंत्रालयातील घटनेपूर्वी आरोग्य कर्मचारी व पीक विम्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही बांगर यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याचे समोर आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांगर यांची वर्षा निवासस्थानी जोरदार कानउघडणी केली, अशी माहिती होती. मात्र, तरीही आमदार संतोष बांगर यांच्या कडून अशा घटना घडत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.