आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील आदर्श शिक्षक निवडण्यासाठी यंदा दोन वर्षानंतर मुहूर्त लागला. शासनाने शिक्षकांकडून नामांकन मागवले, मुलाखती झाल्या. पुरस्कारासाठी १.०५ कोटीच्या निधीची तरतूदही करण्यात आली. आता नावे जाहीर होऊन शिक्षकदिनी पुरस्कार हातात पडेल अशी शिक्षकांना आशा होती. मात्र, चार महिन्यांनंतरही ती लालफितीत अडकली आहे. राज्यातील सत्तांतरामुळे पुरस्कार निवडीची प्रक्रिया रखडली असल्याचा शिक्षकांचा आरोप आहे.
राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या १०९ गुरुजींना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार दिला जातो. शिक्षकांकडून अर्ज मागवून मुलाखती घेतल्या जातात. विजेत्यांना ५ सप्टेंबरला पुरस्काराचे वितरण केले जाते. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा प्रक्रिया राबवली तरी, पुरस्कारांची घोषणा झालेली नाही.
चार महिने उलटून गेले यंदा २०२१-२२ साठी प्रक्रिया राबवण्यात आली. २८ जुलै ते ७ ऑगस्टदरम्यान ऑनलाइन प्रस्ताव मागवले. १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान आधी जिल्हास्तरावर व नंतर राज्यस्तरावर मुलाखती घेतल्या. गुणांकनप्राप्त गुरुजींची माहिती शासनाला कळवण्यात आली. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना प्रत्येकी १ लाख रुपये रोख पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यासाठी २६ ऑगस्ट रोजी शासन निर्णयाद्वारे १.९५ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली.
...तरी घोषणा नाहीच प्रक्रिया राबवून ४ महिने उलटले तरी शासनाकडून पुरस्कारप्राप्त गुरुजींच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे मुलाखती दिलेल्या गुरुजींचे डोळे पुरस्काराच्या घोषणेकडे लागले आहेत. त्याबाबतच्या हालचाली न दिसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. आमच्या पाठीवर कौतुकाची थाप कधी पडणार, असा सवाल त्यांनी केला आहे.
४६५ मुलाखती पुरस्कारासाठी प्राथमिक शिक्षक गटातून ३८, माध्यमिक शिक्षकांतून ३९, आदिवासी क्षेत्रातील शिक्षकांतून १९, सावित्रीबाई फुले शिक्षिका पुरस्कारासाठी ८ आणि विशेष शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, दिव्यांग, स्काऊट, गाइड गटातून प्रत्येकी १ शिक्षकाची अशा १०९ शिक्षकांची निवड केली जाते. त्यासाठी ४६५ शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.
कौतुकाची थाप द्या दोन वर्षांच्या खंडानंतर या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मुहूर्त लागला. याची प्रक्रिया पूर्ण झाली, पण अजून विजेत्यांच्या नावाची घोषणाही झाली नाही. यासाठी नुकतेच शिक्षण आयुक्तांना निवेदन दिले आहे. शासनाने लवकरात लवकर पुरस्कार देऊन गुरुजींच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी.' - सुभाष जिरवणकर, राज्य व राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक समिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.