आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत उद्या नवसाचा मोदक:भाविकांसाठी स्वतंत्र वाहन पार्किंग, वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार

प्रतिनिधी | हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी उद्या लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहेत. - Divya Marathi
विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी उद्या लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहेत.

हिंगोली येथील विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी तसेच नवसाचा मोदक घेण्यासाठी उद्या शुक्रवारी सुमारे 5 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलीस विभागाने तयारी केली असून स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली.

विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह राज्याबाहेरूनही मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. त्यासाठी सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. पोलिस विभागाने बॅरिकेट तयार केले असून यातूनच भाविकांना दर्शनासाठी सोडले जाणार आहे. या ठिकाणी वाशिम कळमनुरी औंढा सेनगाव या भागातून येणाऱ्या भाविकांची वाहने उभे करण्यासाठी रामलीला मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे . याशिवाय जवळा पळशी मार्गाने येणाऱ्या भाविकांच्या वाहनासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था केली आहे.

येथे वाहनाच मनाई

शुक्रवारी (ता. ९) इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशासाठी मनाई असणार आहे. त्यामुळे कोणीही वाहने आणण्याचा प्रयत्न करू नये.

भाविकांना पोलिसांच्या सूचना

दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांनी सोन्याचे दागिने परिधान करून येऊ नये. लहान बालके सोबत असल्यास त्यांच्या खिशामध्ये पालकांची नाव व मोबाईल नंबर असलेली चिठ्ठी ठेवावी. बालक हरवल्याचे लक्षात आल्यास तातडीने बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा. दर्शन रांगेमध्ये छायाचित्रीकरण केले जाणार असून सीसी टीव्ही देखील बसवण्यात आले आहेत. याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाचे पथक तैनात केले जाणार असून स्वतंत्र रुग्णवाहिका देखील असणार आहे.

भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात गर्दी करू नये तसेच नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले आहे.

साध्या वेशातील पथके तैनात राहणार

भाविकांची गर्दी लक्षात घेता चोरीचे प्रकार होऊ नयेत यासाठी साध्या वेशातील पोलिसांची पथके तैनात केली जाणार आहेत. सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय यांची पथकेही या भागात लक्ष ठेवून असणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...