आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातील आयसीयू कक्षच आजारी; सर्व उपकरणे गुंडाळून ठेवली, बेडही रिकामेच

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू कक्षातील उपकरणे वापराअभावी धूळ खात पडली असून कक्षातील बेडवरही धूळ चढली आहे. त्यामुळे आयसीयू कक्षच आजारी असल्याचे दिसू लागले आहे. आता हा कक्ष कधी सुरू होणार याची प्रतीक्षा रुग्णांच्या नातेवाइकांना लागली आहे.

हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात हिंगोली तालुक्यासह सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयात विविध आजारांचे दररोज किमान चारशे ते पाचशे रुग्ण उपचारासाठी येतात. त्यापैकी काही जणांवर उपचार करून घरी पाठवले जाते, तर काही जणांना रुग्णालयात ॲडमिट करून घेतले जाते. यामध्ये काही गंभीर आजारी रुग्णांचीही समावेश आहे. या रुग्णांसाठी रुग्णालयात आयसीयू कक्ष असणे आवश्यक आहे. मात्र रुग्णालयात कक्षच नसल्याने गंभीर आजारी रुग्णांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. अपघातामध्ये जखमी होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण अधिक असून गंभीर आजारी रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात आयसीयू कक्षच नाही. त्यामुळे हृदयविकार व इतर गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले जात आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या रुग्णालयाच्या आयसीयू कक्षाची केवळ पाटीच असून आतमधील बेडवर मोठी धूळ चढली आहे. या कक्षातील बीपी मॉनिटर मशीन, बायपॅप मशीन, व्हेंटिलेटर व इतर उपकरणे चक्क गुंडाळून ठेवण्यात आली आहेत.

लवकरच आयसीयू सुरू होणार
^शासकीय रुग्णालयात सहा बेडचे आयसीयू कक्ष सुरू केले जाणार आहे. पुढील एक महिन्यात हा कक्ष सुरू होईल. कोविडमुळे रुग्णांसाठी कक्षातील व्हेंटिलेटर व बायपॅप मशीन्स बाहेर घेण्यात आल्या होत्या. आता आयसीयूची उभारणी सुरू आहे.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली

बातम्या आणखी आहेत...