आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पभूधारक शेतकऱ्याची स्टेट बँकेकडे मागणी:साहेब, दोन एकर शेतीमध्ये उदरनिर्वाह होत नसल्याने हेलीकॉप्टर खरेदीसाठी कर्ज द्या

हिंगोली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहेब, पीक कर्ज मिळवण्यासाठी कागदपत्रे जुळवताना शेतकऱ्यांची दमछाक होते. जमीन गहाण ठेवूनही कर्ज मिळत नाही. आता दोन एकर शेतीमध्ये उदरनिर्वाह होत नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर खरेदी करून भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू करत असल्याने मला कर्ज द्यावे, अशी मागणी ताकतोडा (ता. सेनगाव) येथील शेतकरी कैलास पतंगे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे गुरुवारी (१६ जून) केली. त्यांच्या या मागणीमुळे बँकेचे अधिकारी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकरी कैलास पतंगे यांना दोन एकर शेती आहे. ते म्हणाले, यावर त्यांची आजी, आई, वडील यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, मागील काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे निव्वळ शेतीवर उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यातच पीक कर्ज देण्यासाठी बँकांचे अनेक कागदपत्रांचे अडथळे पार करावे लागतात. नाहरकत प्रमाणपत्र, सातबारावर बोजा टाकावा लागतो. मात्र, शेती गहाण ठेवूनही पीक कर्ज मिळत नाही. पीक कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. तथापि, दोन एकर शेती विकूनही हेलिकॉप्टर खरेदी करता येत नसल्याने त्यांनी गोरेगाव येथील भारतीय स्टेट बँकेत व्यवस्थापक काळे यांची भेट घेतली. त्यासाठी त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनही दिले आहे.

शेतकरी हा व्यवसाय का करू शकत नाही- पतंगे
सध्या शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. मोठे उद्योगपती हेलिकॉप्टर भाड्याने देऊन चांगले उत्पन्न मिळवतात. मग शेतकरी हा व्यवसाय का करू शकत नाही? शिक्षण घेऊन नोकरी मिळत नाही अन् शेती परवडत नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय निवडला असून त्यासाठी बँकेकडे कर्जाची मागणी केल्याचे कैलास पतंगे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...