आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:खद:पूर्णा नदीच्या पात्रात पाण्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू, खोल खड्ड्यातील पाणी असताना दोघेही पाय घसरून पडले पाण्यात

हिंगोली4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील बोडखा शिवारामध्ये पूर्णा नदीच्या पात्रात असलेल्या पाण्यात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (१२ मे) घडली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोडखा येथील गुलाब अंकुश राठोड हे गुरुवारी सकाळी पूर्णा नदीच्या पात्राच्या पलीकडे असलेल्या शेतात भुईमुगाच्या शेंगा काढण्याच्या कामासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा गोपाल राठोड (१०) व मुलगी विशाखा (७) हे दोघेही सोबत होते.

दरम्यान, वडील शेंगा काढण्याच्या कामात व्यस्त असताना गोपाल व विशाखा पूर्णा नदीच्या पात्राकडे आले. यावेळी नदीपात्रात असलेल्या खोल खड्ड्यातील पाणी पीत असताना दोघेही पाय घसरून पाण्यात पडले. मात्र त्या परिसरात कोणी नसल्यामुळे गोपालने आरडाओरडा करूनदेखील कोणालाही आवाज ऐकू आला नाही. दरम्यान, दुपारी ४ वाजेच्या सुमारास दोन्ही मुले शेतात नसल्याने गुलाब राठोड व इतर शेतकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला.

पूर्णा नदीच्या पात्रामध्ये पाहणी केली असता खड्ड्यातील पाण्यात विशाखाचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. त्यानंतर गोपालचा शोध सुरू करण्यात आला. सायंकाळी त्याचा मृतदेह देखील पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद झाली नव्हती.

पत्नीदेखील गंभीर आजारी
बोडखा येथील गुलाब राठोड यांच्या पत्नीदेखील गंभीर आजारी आहेत. उदरनिर्वाहासाठी मजुरी करावी लागते. त्यामुळे ते पत्नीला घरी ठेवून मुलांना सोबत घेऊन मजुरीच्या कामासाठी गेले होते.

बातम्या आणखी आहेत...