आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून दागीने, रोकड पळवली:हिंगोलीतील घटना, लूट करण्याआधी मोफत धान्य देण्याचे दाखवले होते आमिष

हिंगोली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील मोंढा भागात मोफत धान्य मिळवून देण्याचे अमिष दाखवून महिलेला बाजूला नेत तोंडावर स्प्रे मारून अंगावरील दागिने व रोख ४० हजार रुपये पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. १८ सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींचा शोध सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील येडुद येथील द्वारकाबाई बळीराम भुक्तार (६५) ह्या मंगळवारी ता. १७ हिंगोली येथे बाजारात खरेदीसाठी आल्या होत्या. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी तरुण त्यांच्या जवळ आले. तुम्हाला मोफत धान्य मिळते त्यासाठी कागदपत्रे देतो असे सांगून त्यांना बाजूला नेले. त्यानंतर त्यांच्या तोंडावर स्प्रे मारला. यामुळे द्वारकाबाई बेशुध्द झाल्या. यावेळी त्या दोन तरुणांना त्यांच्या अंगावरील चांदीचे दागिने व हातातील चांदीचे कडे तसेच त्यांच्या जवळ असलेली ४० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

दरम्यान, अर्धा ते एक तासानंतर द्वारकाबाई शुध्दीवर आल्यानंतर त्यांनी पैसे शोधले मात्र त्यांच्या जवळील पैसे पळविल्याचे लक्षात आले तसेच अंगावरील दागिने देखील नव्हते तर मोबाईल देखील नव्हता. या प्रकारामुळे घाबरलेल्या द्वारकाबाई यांनी गावी जाऊन कुटुंबाला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना घेऊन आज हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी द्वारकाबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरी, जमादार वामन पवार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न चालविला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरी पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...