आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात ३००० शाळांमधून १७ मार्च रोजी एकाच वेळी इयत्ता तिसरी, पाचवी व आठवी वर्गाचे राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण केले जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने हे सर्वेक्षण केले जात आहे. जिल्हास्तरावर याची जबाबदारी डाएटवर सोपवण्यात आली आहे. या वेळी ओएमआर पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार आहेत. राज्यस्तरावरून प्रथमच हे सर्वेक्षण केले जात आहे. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता आणि शाळांमधून दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेतली जाणार आहे. राज्यात विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर निश्चितीसाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय संपादणूक चाचणी घेतली जाते. यापूर्वी सन २०१७ व त्यानंतर सन २०२१ मध्ये या चाचण्या झाल्या होत्या. आता राज्य शासनाने राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रँडम पद्धतीने मराठवाड्यातील ३००० शाळांची निवड केली आहे. १७ मार्च रोजी एकाच वेळी शाळांमधून विद्यार्थ्यांची बहुपर्यायी परीक्षा घेतली जाणार आहे.
मराठी व गणित विषयाची ही परीक्षा असणार आहे. यात इयत्ता तिसरी व पाचवी वर्गासाठी मराठी भाषेचे २०, तर गणिताचे २५ असे ४५ प्रश्न असणार असून त्यासाठी दीड तासाचा वेळ असणार आहे. आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचे २५, तर गणिताचे ३५ असे ६० प्रश्न दिले जाणार आहेत. त्यासाठी १ तास २० मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना ओएमआर उत्तरपत्रिकेवर उत्तरे नमूद करावी लागणार आहेत. त्यानंतर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका पुणे कार्यालयाकडे पाठवल्या जाणार आहेत. सुमारे १ महिन्यानंतर या परीक्षांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या शाळांचा निकाल म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा निकाल असणार आहे. या परीक्षेतील गुणानुसार त्या त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता किती आहे, अध्ययन स्थिती काय आहे हे ठरवले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरावर डाएटकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ज्या ज्या ठिकाणी परीक्षा होणार आहे. तेथे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचा पुणे येथूनच पुरवठा केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि शाळेतील सुविधा तपासण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. सर्वेक्षणासाठी यंत्रणांना प्रशिक्षण या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्यक्ष शाळास्तरावर सर्वेक्षण केले जाईल. त्या वेळी शाळेत एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवला जाणार आहे. सदर सर्वेक्षण म्हणजे परीक्षा नाही. त्यामुळे त्याचे गुण कुठेही उघड केले जाणार नाहीत. - अंकुश ससाणे, राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण, हिंगोली विभागप्रमुख.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.