आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात पावसाळ्यात ५.८८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार आता महसूल विभागाकडून लागणाऱ्या रहिवासी, जात प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण केल्याचे छायाचित्र अक्षांश व रेखांशासह जोडावे लागणार आहे. याबाबतच्या सूचनाही विभागीय आयुक्त कार्यालयाने मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना दिल्या.
मराठवाड्यात पावसाळ्यात ५.८८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उपक्रमात वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग यासह जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन तसेच पोलिस प्रशासनांतर्गत विविध विभागांचा समावेश आहे. विशेषतः ग्रामपंचायतीकडून जास्तीत जास्त वृक्ष लागवडीचेही प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व खासगी रोपवाटिकांच्या माध्यमातून रोपे उपलब्ध केली जाणार आहेत.
सदरील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याच्या सूचनाही आयुक्त कार्यालयाने मराठवाड्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांना दिल्या आहेत. यामध्ये वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याची आपली सामाजिक जबाबदारी आहे याचे प्रशिक्षण शालेय जीवनातच होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील प्रांगणात किंवा इतर मोकळ्या ठिकाणी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करावे. यासोबतच शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयातून विविध प्रमाणपत्रे लागतात. सदर प्रमाणपत्राबाबत मागणी करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना वृक्ष लागवड केलेले छायाचित्र अक्षांश रेखांशासह कागदपत्रासोबत जोडण्यास सांगावे असे उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून कळवण्याच्या सूचनाही आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत. तसेच व्यापारी संघटना, हॉटेल संघटना, सेवाभावी संस्था, कोविडमध्ये काम केलेल्या सामाजिक संस्थांनाही वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सहभागी करून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आयुक्त कार्यालयाच्या या सूचनांमुळे आता विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसोबतच वृक्ष लागवड केलेले छायाचित्रही जोडावे लागणार असल्याचे चित्र आहे. त्यातून या उपक्रमाला बळकटी देण्याचे आयुक्त कार्यालयाचे प्रयत्न आहेत.
मराठवाड्यातील २० हजार शाळांमध्ये ट्री क्लब
मराठवाड्यात जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांची संख्या सुमारे २० हजार एवढी आहे. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड व संगोपनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त एक तासाचा जास्तीचा वेळ देऊन वृक्ष लागवड मोहीम राबवावी. तसेच या शाळांमध्ये ट्री क्लब स्थापन करण्याच्या सूचनाही आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.