आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष पत्र पाठवून आभार:मराठवाड्यात परीक्षा सुरळीत पार पाडण्यास केलेल्या सहकार्याबद्दल बोर्डाने मानले जिल्हाधिकाऱ्यांच्या आभार

मंगेश शेवाळकर | हिंगोली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल बोर्डाने मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष पत्र पाठवून आभार व्यक्त केले आहे. राज्यामध्ये यावर्षी इयत्ता दहावी व बारावीमध्ये परीक्षा केंद्रात अडचण होऊ नये तसेच कोविडच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यावर्षी इयत्ता दहावीची परीक्षा केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. इयत्ता बारावी सोबतच इयत्ता दहावीच्या परीक्षा केंद्रांची संख्या वाढल्याने या आव्हान बोर्डासमोर उभे राहिले होते. त्यामुळे बोर्डाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे साकडे घातले होते.

याशिवाय परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. इयत्ता दहावीच्या सुमारे २ हजार तर इयत्ता बारावीच्या सुमारे १ हजार परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या. या सर्व परीक्षा केंद्रांवर बैठे पथक स्थापन करण्यासाठी प्रशासनातील बहुतांश विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठका घेऊन भरारी पथके बैठे पथके नियुक्त केली होती. त्यामुळेच मोठ्या संख्येने परीक्षा केंद्र असतानाही कुठेही गोंधळाची स्थिती निर्माण न होता या परीक्षा सुरळीत पार पडल्या.

या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल बोर्डाच्या वतीने मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

मराठवाड्यात इयत्ता दहावीची औरंगाबाद जिल्ह्यात २२४, जालना १७०, परभणी ९०, नांदेड ६४५, बीड ३०९, उस्मानाबाद ४७७, तर हिंगोली जिल्ह्यात २१३ परीक्षा केंद्र होती. यासोबतच इयत्ता बारावीची औरंगाबाद जिल्ह्यात १५३, जालना ६९, परभणी ५५, नांदेड २८९, बीड ३५३, उस्मानाबाद १२९ तर हिंगोली जिल्ह्यात १०६ परीक्षा केंद्र होते.

बातम्या आणखी आहेत...