आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसमत न्यायालयाचा निकाल:दोन महिलांसह पाचजणांना जन्मठेप, सहा वर्षांपुर्वी औंढ्यातील नांदखेड्यात शेतीच्या वाटणीवरून केला होता एकाचा खून

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील नांदखेडा येथे शेती वाटणीच्या कारणावरून एकाचा खून करून एकाला जखमी केल्याच्या आरोपावरून पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. वसमत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उमाकांत देशमुख यांच्या न्यायालयाने बुधवारी (ता. २३) हा निर्णय दिला.

याबाबत विशेष सरकारी वकील अॅड. सुभाष देशमुख हट्टेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा तालुक्यातील नांदखेडा येथील शिवाजी कदम व गणेश कदम यांच्यात शेती वाटणीच्या कारणावरून वाद सुरू होता. त्यातून किरकोळ हाणामारीच्या घटना देखील घडल्या होत्या.

त्यानंतर २३ जुलै २०१६ रोजी रात्री सात वाजता शिवाजी होनाजी कदम व त्यांचा मुलगा पंढरी कदम यांना शेतात झालेल्या भांडणाच्या कारणावरून तसेच शेती वाटणीच्या कारणावरून गणेश योगाजी कदम, गोविंद गणेश कदम, गोपाळ गणेश कदम, शांताबाई उर्फ शशिकला गणेश कदम, राधाबाई गोविंद कदम यांनी चाकू, कुऱ्हाड व काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत शिवाजी कदम यांचा मृत्यू झाला, तर पंढरी कदम गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात पंढरी कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात २४ जूलै २०१६ रोजी वरील पाच जणांविरुद्ध खुनाचा तसेच एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणात तत्कालीन पोलिस निरीक्षक एल. डी. केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गेडाम यांनी अधिक तपास करून वसमतच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या प्रकरणात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश उमाकांत देशमुख यांनी या प्रकरणात गणेश कदम, गोविंद कदम, शांताबाई उर्फ शशिकलाबाई कदम, राधाबाई कदम, गोपाळ कदम या पाचही आरोपीस खूनाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अॅड. सुभाष देशमुख यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...