आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांमध्ये घबराट:वसमत पंचायत समितीच्या छताचा भाग कोसळला, सुदैवाने कोणीही जखमी नाही, विकासाच्या गप्पा मारणारे नेते गेले कुठे

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत पंचायत समितीच्या इमारतीचा छताचा काही भाग शुक्रवारी दुपारी कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी गप्प का, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

वसमत येथील पंचायत समितीची इमारत सुमारे 60 वर्षापूर्वीची आहे. या इमारतीमधून पंचायत समितीचा कारभार चालतो. अतिशय जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. पंचायत समितीच्या इमारतीची अवस्था लक्षात घेता, या ठिकाणी नव्याने इमारतीचा बांधकामाचा प्रस्ताव सन 2018 मध्ये मंजूर करण्यात आला होता. इमारत बांधकामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर झाला होता. इमारत बांधकामाच्या निविदा देखील मागवण्यात आल्या होत्या. मात्र, तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी केवळ इमारत नको तर व्यापारी संकूल देखील बांधा असा अट्टाहास धरला त्यामुळे निविदा काढण्यात आल्या नाही.

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाकडून सदरील इमारत अतिशय धोकादायक असून इमारत पाडण्याची परवानगी देखील दिली होती. मात्र, पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे अद्यापही या जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये पंचायत समितीचे कामकाज सुरू आहे.

आज दुपारच्या सुमारास पंचायत समितीच्या एका विभागातील छताचा काही भाग कोसळला. या प्रकारामुळे तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून एकच धावपळ झाली. मागील दोन ते तीन वर्षापासून इमारतीच्या छताचा भाग कोसळत असतानाही पर्यायी इमारतीची व्यवस्था केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागली आहे. वसमत विधानसभा मतदार संघात विकास कामाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींचे मात्र नवीन इमारत बांधकामाच्या मंजूरीकडे दुर्लक्ष होऊ लागल्याचे बोलले जात आहे. आता पावसाळ्यामध्ये या इमारतीमध्ये बसून काम कसे करावे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

बातम्या आणखी आहेत...