आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजेगाव (ता. सेनगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील रिक्तपदे तातडीने भरण्याच्या मागणीसाठी पालकांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सोमवारी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्या दालनात शाळा भरवली. जोपर्यंत शिक्षकांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका पालकांना घेतली.
शिक्षकांची 13 पदे मंजूर
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शाळा आहे. या ठिकाणी सुमारे 300 पेक्षा अधिक विद्यार्थी असून, त्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची 13 पदे मंजूर आहेत. मात्र, मागील तीन ते चार वर्षांपासून पाच पदे रिक्त आहेत. यामध्ये मुख्याध्यापकासह प्राथमिक पदवीधर, प्राथमिक शिक्षक व गणित व इंग्रजी विषयाचे दोन शिक्षक असे पाच पदे रिक्त आहेत. गणित व इंग्रजी विषयाच्या शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे.
शिक्षकांची रिक्तपदे भरण्याची मागणी
शिक्षकांची रिक्तपदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी गावकरी रामनाथ चोडकर, डिगंबर महाजन, रामदास कऱ्हाळे, भागवत वाघ यांच्यासह गावकऱ्यांनी शिक्षण विभागाकडे निवेदन दिले होते. मात्र, गावकऱ्यांच्या मागणीकडे शिक्षण विभागाने साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आज सकाळी साडेकरा वाजता विद्यार्थ्यांना घेऊन थेट जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग गाठला. शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्या दालनातच शाळा भरवली. विद्यार्थ्यांची गर्दी पाहून शिक्षणाधिकारीही गोंधळून गेले.
शिक्षणाधिकारीही गोंधळले
गावकऱ्यांनी शाळेतील शिक्षकांच्या रिक्तजागा भरल्या शिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका घेतली. तर ता.15 जुलैपर्यंत शिक्षकांच्या होणाऱ्या बदल्यांमध्ये शाळेवर शिक्षक देण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी दिले. मात्र, त्यांचे तोंडी आश्वासन म्हणजे बोलाची कढी अन बोलाचा भात असल्याचा आरोप करून गावकऱ्यांनी लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. त्यावर दुपारी एक वाजे पर्यंत तोडगा निघाला नसल्याने गावकरी व विद्यार्थी सोनटक्के यांच्या दालनात ठाण मांडून होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.