आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्य कार्यकरी अधिकाऱ्यांचा ग्रीन सिग्नल:हिंगोली जिल्ह्यात फिरत्या एक्सरे व्हॅनच्या माध्यमातून घेतला जाणार संशयित क्षय रुग्णांचा शोध

हिंगोली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यात फिरत्या एक्सरे व्हॅनच्या माध्यमातून संशयित क्षय रुग्णांचा शोध घेतला जाणार असून, वीस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व्हॅन थांबवून रुग्णांचे एक्सरे काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या व्हॅनला सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

एक्सरे व्हॅन का?

हिंगोली जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागातून संशयित क्षयरुग्ण तपासणीसाठी तसेच एक्सरेसाठी येत नाहीत. त्यामुळे रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर औषधोपचार करणे कठीण झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत फिरत्या एक्सरे व्हॅनच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरच एक्सरे काढून संशयित रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे.

अधिकाऱ्यांची उपस्थिती

जिल्हा परिषदेच्या परिसरात फिरत्या एक्सरे व्हॅनला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी हिरवी झेंडा दाखवला. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. जी. एस. मिरदुडे, डॉ. पी. एस. ठोंबरे, शंकर तावडे, विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी यांची उपस्थिती होती.

हिंगोली जिल्हयातील पोतरा, वाकोडी, आखाडा बाळापूर, डोंगरकडा, रामेश्वरतांडा, कवठा, साखरा, कापडसिंगी, गोरेगाव, कुरुंदा, पांगराशिंदे, हट्टा, टेंभुर्णी, जवळाबाजार, शिरडशहापूर, लोहरा, पिंपळदरी, फाळेगाव, सिरसम, नर्सी नामदेव या प्राथमिक आरोग्य केंद्रात नियोजन केलेल्या दिवशी व्हॅन थांबवली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावपातळीवर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून संशयित रुग्णांना आरोग्य केंद्रात आणले जाणार असून त्या ठिकाणी त्यांचे एक्सरे काढले जाणार आहेत. त्यानंतर क्षयरोग असलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार सुरु केले जाणार आहेत.

स्वतःहून आरोग्य केंद्रात यावे

जिल्ह्यातील संशयित रुग्णांच्या शोधासाठी मोबाईल एक्सरे व्हॅन वीस आरोग्य केंद्रात पाठवली जाणार आहे. त्याचे नियोजनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले असून, एक्सरे काढण्यासाठी दोन कर्मचारी नियुक्त करणयात आले आहे. मात्र 15 दिवसांपेक्षा अधिक काळापासून खोकला असलेल्या रुग्णांनी स्वतःहून आरोग्य केंद्रात येऊन एक्सरे काढून घ्यावेत.
- संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी हिंगोली

बातम्या आणखी आहेत...