आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे बाजारगल्ली भागातील महाराष्ट्र बूट हाऊसला शुक्रवारी 10 जून रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीचा वेग इतका होता की, दुकानातले संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. या लागलेल्या आगीमुळे 10 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
नागरिकांची गर्दी
गोरेगाव येथील बाजार गल्ली मध्ये सय्यद सलीम सय्यद जलील यांचे महाराष्ट्र बूट हाऊस नावाचे चप्पल व बूट विक्रीचे दुकान आहे. या ठिकाणी जोड व्यवसाय म्हणून ते द्रोण तयार करण्याचा उद्योग करतात. नेहमीप्रमाणे सय्यद सलीम हे शुक्रवारी रात्री आठ वाजता दुकान बंद करुन घरी गेले होते. नंतर रात्री 10.00 ते 10.30 वाजेच्या सुमारास दुकानातून धूर निघू लागला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नागरिकांनी या प्रकाराची माहिती तातडीने सय्यद सलीम यांना दिली. त्यांनी दुकानाकडे धाव घेऊन या परिस्थितीतही दुकानाचे शटर उघडले. शटर उघडताच दुकानातून आगीचे लोळ उठले. घटनास्थळी नागरिकांनी ही मोठी गर्दी केली.
शॉर्ट सर्किटमुळे आग
नागरिकांनी मिळेल त्या साहित्याने आगीवर पाणी टाकण्यास सुरुवात केली. नागरिक बबन कावरखे, संजय पातळे, सयद सलीम सयद लाल, अनसर कुरैशी, आत्माराम कावरखे, संजय कावरखे, पंचायत समिती सदस्य अशोक कावरखे, इस्राईल टेलर, यासह अनेक नागरीक व व्यापारी मदतीसाठी धावले. दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.
15 लाखांचे नुकसान
यामध्ये सुमारे 10 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गोरेगाव पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक बाबुराव जाधव, जमादार गजेंद्र बेडगे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी गोरेगांव पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.