आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिरंगाई:गावांची तहान भागेना; फक्त 17 टक्के विहिरींची कामे पूर्ण

हिंगोली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात सार्वजनिक सिंचन विहिरींची ४,६७६ कामांपैकी केवळ ८०३ कामेच पूर्ण झाली आहेत. अपूर्ण कामांवरून विभागीय आयुक्त कार्यालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून आठही जिल्हाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आठ दिवसांत खुलासा करण्याचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.

मराठवाड्यात टंचाई उपाययोजनांवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च लक्षात घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयाने सन २०१९-२० या आर्थिक वर्षात प्रत्येक जिल्ह्याने सार्वजनिक सिंचन विहिरींची कामे करून त्याद्वारे गावांना पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या विहिरींची कामे पूर्ण करून जलवाहिन्यांद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा करावा. त्यातून टंचाई उपाययोजनांवर होणाऱ्या खर्चाला आळा बसणार असून गावकऱ्यांचीही पाण्यासाठी होणारी भटकंती कमी होणार असल्याची अपेक्षा होती. दरम्यान, त्यानुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून ४,६७६ विहिरींच्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देऊन विहिरींच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. मात्र तीन वर्षांनंतरही केवळ ८०३ विहिरींचीच कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले असून उर्वरित ३४९९ कामे सुरूच असल्याचे दाखवण्यात आले आहे.

दरम्यान, तीन वर्षांनंतरही सार्वजनिक सिंचन विहिरींची कामे अपूर्ण असल्याच्या कारणावरून विभागीय आयुक्त कार्यालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या विहिरींच्या कामाच्या पूर्णत्वाकडे अक्षम्य दुर्लक्षामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सार्वजनिक सिंचन विहिरींची कामे का अपूर्ण आहेत याचा खुलासा आठ दिवसांत करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...