आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर शिक्षकांच्या बदल्यांना मुहूर्त लागला:आता ई-मेलवरच मिळणार बदल्यांचे आदेश; शिक्षकांनी केले समाधान व्यक्त

हिंगोली4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या अंतरजिल्हा बदल्यांना अखेर मुहुर्त लागला असून बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना ता. 6 ऑगस्ट पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर शिक्षकांच्या बदलीचे आदेश त्यांच्या ई-मेलवर पाठवले जाणार आहे. त्यामुळे बदलीसाठी शिक्षकांकडून मोठ्या संख्येने अर्ज भरल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वेळापत्रक जाहीर

राज्यात शिक्षकांच्या अंतरजिल्हा बदल्या कधी होणार याची प्रतिक्षा शिक्षकांना लागली होती. त्यानंतर याबदल्या ऑफलाईन होणार की ऑनलाईन याबाबतही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. तर दुसरीकडे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यामुळे बदल्या होण्याची आशा मावळली होती. मात्र ग्रामविकास विभागाने अंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन केल्या जाणार असल्याचे स्पष्ट करीत या बदल्याचे वेळापत्रकच जाहिर केले आहे.

त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून बिंदू नामावलीनुसार रोस्टर भरून घेण्यात आले आहे. तर बिंदू नामावली नुसार कुठल्या जिल्हयात किती जागा व कोणत्या संवर्गाच्या जागा रिक्त आहेत याची माहिती ऑनलाईन प्रदर्शित केली असून सदर माहिती शुक्रवारपर्यंत ता. 5 शिक्षकांना पाहता येणार आहे.

त्यानंतर ता. 6 ऑगस्ट ते ता. 9 ऑगस्ट या कालावधीत शिक्षकांना अंतरजिल्हा बदलीचे अर्ज ऑनलाईन भरता येणार आहेत. तर ता. 10 ऑगस्ट पासून प्रत्यक्ष बदली प्रक्रिया राबवली जाणार आहे. ता. 12 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पार पाडली जाणार असून शिक्षकांच्या मागणीनुसार त्या त्या जिल्हयात जागा असेल तर त्यांच्या अर्जावर तातडीने निर्णय घेतला जाणार आहे. तर ता. 13 ऑगस्ट रोजी बदली झालेल्या शिक्षकांच्या ईमेल वर त्यांच्या बदलीचे आदेश पाठवले जाणार आहेत.

शिक्षकांनी केले समाधान व्यक्त

दरम्यान, बदली झालेल्या शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करावे लागणार असून या शिक्षकांना तातडीने बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे. दरम्यान, शासनानेच वेळापपत्रक जाहिर केल्यामुळे आता शिक्षकांची ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी गर्दी पहावयास मिळणार आहे. उशीरा का होईना अंतरजिल्हा बदलीबाबत कार्यवाही होणार असल्याने शिक्षकांतून समाधान व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...