आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघुउद्योगास चालना:सव्वातीन हजार बचत गट होणार सक्षम; एकाच दिवसात 40 कोटींच्या कर्जाचे वाटप

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सव्वातीन हजार बचत गटांना एकाच दिवसात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने ४० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे गट विविध व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत.

मराठवाड्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. या बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना सुरुवातीला प्रत्येकी ४० हजार रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जात असून त्यानंतर गटांना लघुउद्योग सुरू करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. त्यासाठी जीवनोन्नती अभियानाच्या जिल्हा कार्यालयामार्फत गटांचे कर्ज मागणीचे प्रस्ताव तयार करून हे प्रस्ताव कर्ज वाटपासाठी बँकेकडे सादर केले जात आहेत.

दरम्यान, मराठवाड्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने २७ मे राेजी सर्व जिल्ह्यांत एकाच वेळी कर्जवाटपाचे मेळावे घेण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर हा कार्यक्रम घेण्यात आला असून त्यासाठी कर्ज मंजूर झालेल्या गटांना जिल्हास्तरावर बोलावण्यात आले होते. या कर्जवाटप मेळाव्यामध्ये मराठवाड्यातील सव्वातीन हजार गटांना एकाच दिवशी तब्बल ४० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. यात सर्वात जास्त नांदेड जिल्ह्यात ८५६ गटांना १० कोटी रुपयांचे वाटप झाले. या कर्जातून गटांनी विविध व्यवसाय सुरू करून कर्जफेडीसोबतच आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे अपेक्षित आहे.

मराठवाड्यात पुन्हा ८ जूनला मेळावा
मराठवाड्यात इतर बँकांकडूनही गटांना कर्ज देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार कर्ज मागणीचे प्रस्ताव तातडीने निकाली काढून गटांना युद्धपातळीवर कर्ज मंजूर केले जात आहे. त्यानंतर ८ जून रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत कर्ज वितरण मेळावा घेतला जाणार असल्याचे महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्हानिहाय कर्ज वाटप : मराठवाड्यात एकाच दिवशी मेळाव्यात औरंगाबाद जिल्ह्यात ४४८ गटांना ५.४० कोटी, हिंगोली ३३१ गटांना ४.०४ कोटी, नांदेड ८५६ गटांना १०.१२ कोटी, परभणी ४८० गटांना ७ कोटी, उस्मानाबाद ६०८ गटांना ८.५७ कोटी, लातूर १७२ गटांना २.९५ कोटी तर बीड जिल्ह्यात २४९ गटांना २ कोटींचे कर्ज वाटप झाले.

बातम्या आणखी आहेत...